मुंबईची गाडी सुरू होणार?; चेन्नईच्या मैदानावर कोलकाताचं आव्हान

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 13 April 2021

IPL 2021 : २०१३ पासून सलामीचा सामना गमावण्याची त्यांची परंपरा कायम राहिली आहे. ‘धक्का स्टार्ट' गाडी सुरू होणार की गॅरेजमध्येच राहणार, याची उत्सुकता असेल.

IPL 2021, Match Preview KKR vs Mum : चेन्नई - आयपीएलच्या इतिहासात कोलकाताविरुद्ध मुंबई इंडियन्स संघाचे नेहमीच वर्चस्व राहिले असले आणि दोघांमधील लढतीत विजयांची संख्या मुंबईकडे अधिक असली, तरी उद्याच्या सामन्यात मात्र कोलकाता मानसिकदृष्ट्या एक पाऊल पुढे आहे. सलामीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे मुंबईसमोर भोपळा फोडण्याचेही आव्हान असणार आहे.  आयपीएलमध्ये सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद मिळवल्याचा पराक्रम मुंबईच्या नावावर असला, तरी २०१३ पासून सलामीचा सामना गमावण्याची त्यांची परंपरा कायम राहिली आहे. ‘धक्का स्टार्ट' गाडी सुरू होणार की गॅरेजमध्येच राहणार, याची उत्सुकता असेल. दुसऱ्या बाजूला कोलकाताने रविवारच्या सामन्यात हैदराबादचा पराभव करून सलामीचा आत्मविश्वास मिळवलेला आहे. 

हेही वाचा ; यूनिवर्स बॉसचा षटकारांचा विक्रम; रोहित-धोनी आसपासही नाहीत

एरवी सलामीला सामना गमावल्यानंतर पुढच्या सामन्यास सामोरे जाताना दडपण असते; परंतु मुंबईसाठी हे नित्याचे असल्याने त्यांचे खेळाडू कोणत्याही क्षणी फॉर्मात येण्याची शक्यता आहे. दोन्ही संघात नावाजलेले खेळाडू असल्यामुळे गिअर बदलण्यासाठी त्यांना वेळ लागणार नाही, परिणामी तुल्यबळ सामन्याची मेजवानी मिळणार आहे.
बंगळूरविरुद्ध मुंबईचा अखेरच्या चेंडूवर पराभव झाला होता. काही चुका आणि फिरकी गोलंदाजीतले अपयश मुंबईला बॅकफूटवर टाकणारे ठरले होते. त्यामुळे उद्याच्या सामन्यात लेगस्पिनर पियूष चावलाला संधी मिळू शकते; परंतु चावला या अगोदर कोलकाताचा खेळाडू असल्याने ऑफस्पिनर जयंत यादवचाही पर्याय तपासला जाऊ शकतो.

IPL 2021 : ट्रक ड्रायव्हरच्या पोराची धमाकेदार एन्ट्री

लीन की डिकॉक?
नियमित सलामीवर डिकॉकचे विलगीकरणात सात दिवस पूर्ण न झाल्यामुळे पहिल्या सामन्यात खेळला नव्हता. उद्याच्या सामन्यासाठी तो उपलब्ध आहे; परंतु त्याच्याऐवजी पहिल्या सामन्यात खेळलेल्या ख्रिस लीनने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे उद्या लीनला आणखी एक संधी द्यावी की डिकॉकचा समावेश करावा, असा प्रश्न मुंबईसमोर असेल. पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या सुपरस्टार रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि किएरॉन पोलार्ड यांच्याकडून मुंबईला मोठ्या अपेक्षा असतील.

हेही वाचा ; दीपकचा षटकारांचा पाऊस, केला मोठा विक्रम


​ ​

संबंधित बातम्या