प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी जैवसुरक्षाद्वारे तटबंदी; स्टार स्पोर्टसची माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 7 April 2021

IPL 2021 :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्र पुन्हा चिंतेचे वातावरण तयार झाले

IPL 2021 : केवळ खेळाडू आणि संघच नव्हे, तर आयपीएलशी संबंधित सर्वांत लहान घटकालाही सुरक्षित वाटायला हवे, अशी जैवसुरक्षा चौकट आम्ही तयार केली आहे आणि हे सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होत आहे, अशी माहिती स्टार स्पोर्टस डिस्ने इंडियाचे प्रमुख संजोय गुप्ता यांनी `सकाळ`शी बोलताना दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्र पुन्हा चिंतेचे वातावरण तयार झाले असले तरी आम्ही अतिशय सुरक्षित तटबंदी तयार केली आहे. सध्या मुंबईत चार ठिकाणी जैवसुरक्षा वातावरण तयार करण्यात आले आहे. त्यात सामन्याच्या चित्रीकरण आणि प्रक्षेपण आणि तांत्रिक बाजू सांभाळणारे सदस्य, समालोचक, चार संघ यांचा समावेश आहे. जैवसुरक्षा वातावरणात येण्यापूर्वी प्रत्येकाची कोव्हिड चाचणी,  विलगीकरण आणि त्यानंतर दर पाच दिवसांनी पुन्हा चाचणी अशी रचना आम्ही केली आहे आणि सामन्यांच्या ठिकाणानुसार हे बदलत राहणार आहे, असे संजोग यांनी सांगितले.

महाराष्ट्र प्रभावी मार्केट
मुंबई भारतीय क्रिकेटची पंढरी आहेच, येथे क्रिकेटला सर्वाधिक प्राधान्य असतेच, परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आयपीएलची लोकप्रियता आहे आणि स्पर्धेगणिक ती वाढत आहे. अमिरातीत झालेल्या आयपीएलच्या लोकप्रियतेत इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात १८ टक्यांनी वाढ झाली, अशी माहिती संजोग यांनी दिली. मुंबई, महाराष्ट्रात असलेली क्रिकेट संस्कृती जोपासण्यासाठी ओटीटीवर मराठी समालोचनाची तयारी केली आहे. त्यात संदीप पाटील, अमोल मुझुमदार असणार आहे, असेही संजोग म्हणाले.

IPL 2021 : पंतचा ट्रेलर पाहिला; रेकॉर्डचा पिक्चर अभी बाकी है दोस्त!

आयपीएल काम सोपे करेल
सध्या महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी आहे. आयपीएलचे सामने ७.३० वाजता सुरू झाल्यावर सर्व जण विनाकारण गरज नसताना बाहेर जाण्याऐवजी घरात राहून सामने पाहण्यास प्राधान्य देतील. आयपीएलचा असाही फायदा होईल, असे मत संजोग यांनी मांडले.

घरातच स्टेडियमचा स्टँड  
प्रेक्षकांविना आयपीएल होत असली तरी टीव्हीवरील प्रेक्षकांना स्टेडियममध्ये असल्याचा आनंद देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. रिकामे स्टँड दिसू नयेत म्हणून क्लोज कॅमेरे असणार आहेत, त्यामुळे खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे भाव सहज टिपता येतील. तसेच `फॅन वॉल` या संकल्पनेमुळे घरातून सामने पाहताना तुम्हाला टीव्हीवरही दिसण्याची संधी मिळणार आहे


​ ​

संबंधित बातम्या