IPL 2021; SRHvsKKR : 2 कोटींचा केदार जाधव बाकावरच!

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 11 April 2021

डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील संघात पहिल्या सामन्यासाठी  मनिष पांडे, विजय शंकरसह वृद्धीमान साहाला यांना संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघाकडून प्रतिनिधीत्व करताना वनडेत सर्वाधिक जलदगतीने हजार धावांचा टप्पा पार करणारा केदार जाधव यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात सामील झालाय. चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या मिनी लिलावापूर्वी त्याला रिलीज केले होते. मध्यफळीतील या फलंदाजाला सनरायझर्स हैदराबादने 2 कोटी मोजून आपल्या ताफ्यात घेतले होते. युएईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात चेन्नईकडून खेळताना त्याने नावाला साजेसा खेळ केला नव्हता. हैदराबादने त्याला आपल्या ताफ्यात घेतले असले तरी पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळालेली नाही. 

डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील संघात पहिल्या सामन्यासाठी  मनिष पांडे, विजय शंकरसह वृद्धीमान साहाला यांना संधी देण्यात आली आहे. अनकॅप्ड अब्दुल समदने मागील हंगामात लक्षवेधी कामगिरी केली होती. त्यालाही संघात स्थान मिळाले. पण केदार जाधवला आणखी काही सामने प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे संकेतच या सामन्यातील प्लेइंग इलेव्हन जाहीर झाल्यानंतर मिळाले. 

IPL 2021 : भगव्याची शान कायम ठेवा; ऑरेंज आर्मीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

आयपीएलच्या 13 व्या हंगामात केदार जाधव हा धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातून खेळला होता. यावेळी त्याला 8 सामन्यात संधी मिळाली. पण त्याला विशेष छाप सोडता आली नव्हती. 5 डावात त्याने 62 धावा केल्या होत्या. यात 26 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. आतापर्यंत आयपीएलमध्ये केदार जाधवने 87 सामने खेळले असून यात त्याने 1141 धावा केल्या आहेत. मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असली तरी तो सध्या बॅडपॅचमधून जात आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याला खूप काही लक्षवेधी कामगिरी नोंदवता आली नव्हती. 2019 च्या वर्ल्डकपमध्येही त्याला संघात स्थान मिळाले. काही सामन्यात त्याला संधीही मिळाली पण त्याला या संधीच सोन करता आले नव्हते. गत हंगामातील खराब कामगिरीनंतरही सनरायझर्स हैदराबादने त्याला आपल्या संघात सामील करुन घेतले असून ते त्याचा वापर कसा करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Sunrisers Hyderabad XI: डेविड वॉर्नर, वृद्धीमान साहा, मनिष पांडे, जॉनी बेयरस्टो, विजय शंकर, मोहम्मद नबी, समद, राशीद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, टी नटराजन.


​ ​

संबंधित बातम्या