स्टार परदेशी खेळाडू नसले तरी आयपीएल होणारच; बीसीसीआयचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 June 2021

आमचे प्राधान्य आयपीएलचा मोसम पूर्ण करण्यास आहे. जेवढे परदेशी खेळाडू उपलब्ध होतील ते चांगलेच आहे; पण परदेशी स्टार खेळाडू नसल्यामुळे स्पर्धेचे संयोजन थांबणार नाही, असे भारतीय क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले.

मुंबई - आमचे प्राधान्य आयपीएलचा मोसम पूर्ण करण्यास आहे. जेवढे परदेशी खेळाडू उपलब्ध होतील ते चांगलेच आहे; पण परदेशी स्टार खेळाडू नसल्यामुळे स्पर्धेचे संयोजन थांबणार नाही, असे भारतीय क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले.

भारतीय मंडळाचे पदाधिकारी आयसीसीच्या बैठकीसाठी दुबईत आले आहेत. त्या वेळी शुक्ला यांनी खलीज टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत परदेशी खेळाडू नसले, तरी आयपीएल होणारच, असे सांगितले. आयपीएलच्या तारखा निश्चित करण्यापूर्वी आम्ही परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत चर्चा केली. आमचे प्रमुख लक्ष्य स्पर्धा पूर्ण करण्यास आहे. ही स्पर्धा अर्धवटच सोडता येणार नाही. जेवढे परदेशी खेळाडू उपलब्ध होतील, ते चांगले. जे उपलब्ध नाहीत, त्यांच्यामुळे स्पर्धेचे संयोजन थांबणार नाही, असे शुक्ला यांनी सांगितले. 

आयपीएलसाठी भारतीय खेळाडू नक्कीच उपलब्ध असतील. काही परदेशी खेळाडूही येतील, तर काही उपलब्ध नसतील. अर्थातच फ्रँचाईज या परिस्थितीत पर्यायी खेळाडूंचा विचार करतील. जे खेळाडू उपलब्ध असतील, त्यांच्यासह स्पर्धा घेण्याचे आम्ही ठरवले आहे. तेच आमचे धोरण आहे, असेही त्यांनी सांगितले. 

राजीव शुक्ला म्हणाले...

  • आयपीएलमधील सर्व खेळाडूंचे लसीकरण पूर्ण झाले असावे हा प्रयत्न
  • अर्थातच याबाबत भारत तसेच अमिरातीच्या सरकारच्या निकषांचे पालन
  • आयपीएल अमिरातीत खेळवण्याच्या निर्णयाचे फ्रँचाईजकडून स्वागत

​ ​

संबंधित बातम्या