सलग तीन पराभवांनंतर अखेर सनराझर्स हैदराबादचा सूर्योदय

पीटीआय
Thursday, 22 April 2021

सलग तीन पराभवांनंतर अखेर सनराझर्स हैदराबादचा सूर्योदय झाला. पंजाब संघाचा नऊ विकेटने पराभव करून यंदाच्या आयपीएलमधील हैदराबादने पहिला विजय मिळवला.

चेन्नई - सलग तीन पराभवांनंतर अखेर सनराझर्स हैदराबादचा सूर्योदय झाला. पंजाब संघाचा नऊ विकेटने पराभव करून यंदाच्या आयपीएलमधील हैदराबादने पहिला विजय मिळवला. गोलंदाजांची शानदार कामगिरी आणि त्यानंतर डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टॉ यांची शानदार फलंदाजी हैदराबादच्या नावावर पहिल्या गुणाची नोंद करणारी ठरली.

संथ असलेल्या खेळपट्टीवर फलंदाजी सोपी नव्हती, याचा फायदा हैदराबादच्या गोलंदाजांनी घेतला आणि पंजाबचा डाव १२० धावांत गुंडाळला. हे आव्हान माफक असले, तरी आणि एकच विकेट गमावली, तरी हैदराबादने त्यासाठी १८.४ षटके घेतली. त्यामुळे तळातून त्यांनी प्रगती केली असली, तरी सरासरी चांगल्या प्रमाणात उंचावता आली नाही.

फलंदाजीतील अपयशामुळे सलग तीन पराभव झाल्याने हैदराबादने आज बदल केला. तंदुरुस्त झालेला केन विल्यम्सन संघात परतला; तसेच मनीष पांडेला वगळून केदार जाधवची निवड केली; परंतु तिघांनाच फलंदाजीची संधी मिळाली.

आव्हान कमी असले, तरी वॉर्नर आणि बेअरस्टॉ यांनी सावध सुरवात केली. १० षटकांत ७३ धावांची सलामी देताना त्यांनी टॉप गिअरमध्ये फलंदाजी करता आली नाही. स्ट्राईक रेट शंभरच्या आसपास होता. वॉर्नर ३७ चेंडूंत ३७ धावाच करू शकला. विल्यम्सननेही वेळ घेतला; परंतु बेअरस्टॉने नाबाद ६३ धावा करताना या वेळी अखेरपर्यंत आपण मैदानात राहू, याची दक्षता घेतली.

हैदराबादने नियोजित मारा करून पंजाब संघाची फलंदाजी सावरूच दिली नाही. बघता बघता त्यांचा निम्मा संघ ६३ धावांत बाद झाला तेव्हा तीन अंकी धावाही कठीण वाटत होत्या. शाहरुख खानने नाबाद २२ धावांचे योगदान दिले. त्यामुळे शंभरी पार करता आली. 

आक्रमक शैलीच्या निकोलस पुरनचे अपयश पंजाबला सतावत आहे. सलग तीन सामन्यांत तो शून्यावर बाद झाला. आज धावचीत होण्याची वेळ त्याच्‍यावर आली.

संक्षिप्त धावफलक 
१९.४ षटकांत सर्वबाद १२० (मयांक अगरवाल २२ -२५ चेंडू, २ चौकार, ख्रिस गेल १५ -१७ चेंडू, २ चौकार, दीपक हुडा १३ -११ चेंडू, २ चौकार, शाहरुख खान २२ -१७ चेंडू, २ षटकार, अभिषेक शर्मा २४-२, खलिल अहमद २१-३, रशीद खान १७-१) पराभूत वि. हैदराबाद - १८.४ षटकांत १ बाद १२१ (डेव्हिड वॉर्नर ३७ -३७ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, जॉनी बेअरस्टॉ  नाबाद ६३-५६ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार, फॅबिन अलेन २२-१.


​ ​

संबंधित बातम्या