भारतातील ते दिवस फारच विदारक होते - वॉर्नर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 June 2021

आयपीएल सुरू असताना भारतात कोरोनाचा उद्रेक झाला होता. ऑक्सिजनसाठी लोक रस्त्या-रस्त्यावर फिरत होते. मृत झालेल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी रांगा लावत होते.

सिडनी - आयपीएल सुरू असताना भारतात कोरोनाचा उद्रेक झाला होता. ऑक्सिजनसाठी लोक रस्त्या-रस्त्यावर फिरत होते. मृत झालेल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी रांगा लावत होते. भारतातील हे चित्र मायदेशात टीव्हीच्या माध्यमातून दिसत होते आमच्या कुटुंबात अतिशय चिंता वाढवणारे होते, अशी आठवण हैदराबाद संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मायदेशी परतल्यावर सांगितली.

भारतातील कोरोना काळातील अशी विदारक चित्रे आम्ही हॉटेलमधून सामन्यासाठी स्टेडियमध्ये जाताना पाहायचो तेव्हा सद्‍गदित व्हायचो, असे वॉर्नर म्हणाला. आयपीएल ४ मे रोजी स्थगित झाल्यानंतर काही दिवस मालदीव आणि तेथून मायदेशी परतल्यावर पुन्हा १४ दिवसांचे विलगीकरण अशी आव्हाने पार करून ऑस्ट्रेलिया खेळाडू दोन दिवसांपूर्वी आपल्या घरी दाखल झाले.

कोरोनामुळे भारतात निर्माण झालेली परिस्थिती फारच भयंकर होती. मानवतेच्या नजरेतून फारच विषण्ण करणारी होती. अशा परिस्थितीत बीसीसीआयने आयपीएल स्थगित केली, हे चांगलेच झाले, अशी भावना वॉर्नरने व्यक्त केली.

विमानाचा प्रवास पुन्हा जैवसुरक्षा वातावरण अशी कसरत करताना आमचीही दमछाक होत होती. बीसीसीआयने आयपीएल खेळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. भारतात क्रिकेट सर्वाधिक लोकप्रिय आहे, अशा आव्हानात्मक परिस्थितीत आम्ही काही जणांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवू शकलो, याचे समाधान वाटत होते, असे वॉर्नरने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या