पंच नितीन मेनन यांनी आयपीएलमधून घेतली माघार

पीटीआय
Friday, 30 April 2021

आई आणि पत्नीला कोरोनाची लागण झाल्यामुळे पंच नितीन मेनन यांनी आयपीएलमधून लगेचच माघार घेतली आहे. त्यांच्या आईला इंदूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - आई आणि पत्नीला कोरोनाची लागण झाल्यामुळे पंच नितीन मेनन यांनी आयपीएलमधून लगेचच माघार घेतली आहे. त्यांच्या आईला इंदूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे पंच पॉल रायफल यांनीही आयपीएल सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु दोहा मार्गे ऑस्ट्रेलियात जाण्याचा प्रयत्न करत असताना दोहाचे विमान रद्द झाल्यामुळे रायफल यांना सध्या तरी भारतातच राहावे लागणार आहे.

नितीन मेनन यांच्या कुटुंबालाच कोरोनाने घेरले आहे. आई रुग्णालयात आहे, पत्नी आजारी आहे; तर वडिलांचीही प्रकृती ठीक नाही त्यांनाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. मेनन यांना पाच वर्षांचा मुलगाही आहे. त्यामुळे नितीन यांनी लगेचच इंदूरमध्ये परतण्याचा निर्णय घेतला.

भारतात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संखेमुळे पंच रायफल यांनीही मायदेशी जाण्याचा प्रयत्न केला. अहमदाबाद-दोहा आणि दोहा ते सिडनी असा प्रवास ते करणार होते, परंतु हॉटेलमधून जैवसुरक्षा वातावरणातून बाहेर जाण्यास १० मिनिटे असताना दोहा-सिडनी विमान रद्द झाल्याचे त्यांना समजले. त्यामुळे आता त्यांना आयपीएल संपेपर्यंत भारतातच थांबावे लागणार असल्याचे समजते.

मी प्रयत्न केला, परंतु दोहाचे विमान रद्द झाले. सध्या मी अहमदाबाद येथील हॉटेलमध्ये आहे, असे त्यांनी सांगितले. जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी मायदेशी जाण्याचा प्रयत्न करेन असेही रायफल म्हणाले.


​ ​

संबंधित बातम्या