आम्ही चांगली लढत दिली - इऑन मॉर्गन

सुनंदन लेले
Friday, 23 April 2021

पहिल्या पाच फलंदाजांनी केलेल्या चुका संघाला महागात पडल्या. आम्ही थोडा संयम ठेवला असता तर धावांचा पाठलाग अशक्य नव्हता हेच कार्तिक- रसेल- कमिन्सने दाखवले.

पाच बाद ३१ या अवस्थेतून आम्ही चांगली लढत दिली हेच माझ्यासाठी खूप आहे. दिनेश कार्तिक-आंद्रे रसेलची भागीदारी आणि नंतर पॅट कमिन्सने केलेली धमाकेदार फलंदाजी आम्हाला लक्ष्याच्या जवळ घेऊन गेली हेच समाधान वाटते, असे इऑन मॉर्गनने सांगितले.

पहिल्या पाच फलंदाजांनी केलेल्या चुका संघाला महागात पडल्या. आम्ही थोडा संयम ठेवला असता तर धावांचा पाठलाग अशक्य नव्हता हेच कार्तिक- रसेल- कमिन्सने दाखवले. चेपॉक आणि वानखेडेच्या खेळपट्टीत खूप फरक आहे. आमच्या गोलंदाजांना त्यानुसार बदल करण्याची गरज होती, पण ते अपेक्षेइतके जमले नाही. त्यातून नको त्या वेळी आम्ही नो बॉल टाकले. चेन्नई संघाने सुरुवात चांगली केल्याने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला गेला. त्याचा त्यांनी फायदा घेतला. फलंदाजी म्हणून माझी कामगिरी चांगली होत नाही हे मी जाणतो. मी सरावात मेहनत करतो आहे. आशा आहे की येणाऱ्या सामन्यात संघाला विजयी करणाऱ्या खेळी माझ्याकडून होतील, असेही त्याने सांगितले.

विकेटचा अंदाज नव्हता
खेळपट्टीचा अंदाज घेऊन फलंदाजी केली नाही हेच माझ्या मते आमच्या पंजाब किंग्ज संघाच्या पराभवाचे कारण आहे, असे अँडी फ्लॉवरने सांगितले. आम्ही विकेटचा अंदाज घेतला नाही. त्यानुसार तंत्रात बदल केले नाहीत. चेन्नईची खेळपट्टी फलंदाजीला सोपी नव्हती, हे खरे असले तरी आम्ही प्रयत्नात कमी पडलो. डावाच्या सुरुवातीला फलंदाज बाद झाले की दडपण वाढतच जाते याचा अनुभव आम्हाला आला. सनरायझर्ससारख्या तगड्या फलंदाजीला आव्हान देता येईल अशी धावसंख्या उभारता आली नाही. या खेळपट्टीवर चौकार, षटकार मारणे सोपे नसेल. या परिस्थितीत मोकळ्या जागेत चेंडू मारून धावा पळून काढणे आवश्यक असते. धावा चोपून काढता नाही आल्या तरी कोरून काढण्याचा प्रयत्न करायला हवा. बेअरस्टो-वॉर्नर जोडीने नेमके हेच केले आणि त्यांना धावांचा पाठलाग करणे सोपे गेले, असेही त्यांनी सांगितले.

संघाने विश्वास दाखवला
पहिल्या काही सामन्यांत माझ्या धावा होत नसूनही संघाने माझ्यावर विश्वास दाखवला. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात माझ्या धावा झाल्या आणि महत्त्वाची बाब म्हणजे संघ विजयी झाला म्हणून समाधान जास्त आहे, असे ऋतुराज गायकवाडने सांगितले. फाफ डु प्लेसिसबरोबर फलंदाजी करायला मजा येते. तो अनुभवी आहे. फलंदाजी करताना तो खूप शांत असतो. विविध फटके मारून तो सहकाऱ्यावरील दडपण कमी करतो. सुरुवातीच्या काही षटकांत परिस्थितीचा अंदाज घेतला आणि त्यानंतरच आम्ही फटकेबाजी सुरू केली. एका खेळीवर मी समाधानी नाही. कामगिरीत सातत्य आणून संघाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवायचा आहे, असेही तो म्हणाला.


​ ​

संबंधित बातम्या