IPL 2021 : DC चा कॅप्टन कोण? पॉन्टिंग स्मिथला झुकत माप देईल

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 29 March 2021

आगामी हंगामात दिल्ली कॅपिटल्सची धूरा कोण सांभाळणार? असा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरतोय. जाणून घेऊयात दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वासाठी कोण-कोणत्या नावाचा विचार होऊ शकतो. 

आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. ज्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली युएईमध्ये रंगलेल्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने फायनल गाठली होती तो आगामी आयपीएल स्पर्धेला मुकणार आहे. पुण्यातील वनडे सामन्यात श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यातून सावरायला त्याला खूप वेळ लागणार असून त्याच्या दुखापतीने दिल्ली कॅपिटल्सचे टेन्शन वाढले आहे. आगामी हंगामात दिल्ली कॅपिटल्सची धूरा कोण सांभाळणार? असा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरतोय. जाणून घेऊयात दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वासाठी कोण-कोणत्या नावाचा विचार होऊ शकतो. 

रविचंद्रन अश्विन

2018 आणि 2019 च्या हंगामात अश्विनने किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व (सध्याचे नाव पंजाब किंग्ज) केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाबने 2018 च्या हंगामात 6 पैकी 5 सामने जिंकले होते. त्यामुळे त्याच्या नावाचाही विचार दिल्ली कॅपिट्ल्सच्या कर्णधारपदासाठी होऊ शकतो. 

स्टीव्ह स्मिथ

दिल्ली कॅपिटल्सच्या नव्या कर्णधाराच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथचे नाव आघाडीवर आहे. राजस्थान रॉयल्सने  रिलीज केलेल्या स्मिथला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले होते. मागील हंगामात स्मिथने राजस्थानचे नेतृत्व केले होते. 2017 च्या हंगामात स्मिथने धोनी- रहाणेच्या असलेल्या पुणे सुपर जाएट्ंस संघाचे नेतृत्व केले होते. पॉटिंग हा दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यामुळे स्मिथला अधिक पंसती मिळू शकते.

रिषभ पंत

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. फलंदाजीमध्ये त्याने परिपक्वता सिद्ध केली आहे.  श्रेयस अय्यरच्या जागीत त्याच्याकडे नेतृत्व देण्याचा विचार झाला तर नवल नसेल. याच कारण स्टेट लेव्हलला त्याने दिल्लीचे नेतृत्व केले आहे. 2017 मध्ये रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघाने रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्याच्याही नावाचा विचार होऊ शकतो.  

 पृथ्वी शॉ

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील फ्लॉप शोनंतर पृथ्वी शॉने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दमदार खेळ करुन आपल्यातील क्षमता सिद्ध केली होती. त्याने मुंबईचे नेतृत्व करताना द्विशतकी खेळी केली. एवढेच नाही तर त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने विजय हजारे ट्रॉफी देखील जिंकली. या स्पर्धेत त्याने 885 धावा केल्या आहेत. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सकडे हा देखील एक पर्याय निश्चित असेल.
 


​ ​

संबंधित बातम्या