राहीची सुवर्णपदकासह ऑलिंपिक पात्रता 

वृत्तसंस्था
Monday, 27 May 2019

नेमबाजांची पंढरी असलेल्या जर्मनीत विशेषतः म्युनिचमधील स्पर्धेस कायम जोरदार प्रतिसाद लाभतो. भारताने पहिल्या दोन दिवसांतच तीन सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यातही राहीचे सुवर्णपदक जास्त मोलाचे आहे. प्राथमिक फेरीत तिसरी असलेल्या राहीपेक्षा मनूची सुरवात चांगली होती.

मुंबई : राही सरनोबतने विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेताना भारतास ऑलिंपिक पात्रताही मिळवून दिली. या स्पर्धेत मनू भाकर हिला भारतास या प्रकारात दुसरी ऑलिंपिक पात्रता मिळवून देण्याची संधी होती; पण तिचे पिस्तूल ऐनवेळी खराब झाले आणि एका गुणाने तिची पात्रता हुकली. दरम्यान, सौरभ चौधरीने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. 

नेमबाजांची पंढरी असलेल्या जर्मनीत विशेषतः म्युनिचमधील स्पर्धेस कायम जोरदार प्रतिसाद लाभतो. भारताने पहिल्या दोन दिवसांतच तीन सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यातही राहीचे सुवर्णपदक जास्त मोलाचे आहे. प्राथमिक फेरीत तिसरी असलेल्या राहीपेक्षा मनूची सुरवात चांगली होती. ती चौथ्या टप्प्यापर्यंत सर्वाधिक सोळा गुणांसह आघाडीवर होती, त्या वेळी राही संयुक्त दुसरी होती. पाचव्या फैरीनंतरही मनू आणि राही संयुक्तपणे आघाडीवर होत्या; पण त्याचवेळी मनूचे पिस्तूल बिघडले. तिला सलग पाच प्रयत्नांत लक्ष्यवेध साधता आला नाही. याचा फायदा घेत बल्गेरियाच्या ऍनातोएनेता हिने एका गुणाने मनूला मागे टाकत अव्वल चारमध्ये स्थान मिळवले. मनूचे पिस्तूल खराब झालेल्या फैरीअखेर राहीने 24 गुणांसह संयुक्त अव्वल स्थान मिळवले होते. 

मनू बाद झाली, हे पाहिल्यावर राहीने अधिक जिद्दीने नेमबाजी केली. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेली पहिली भारतीय महिला नेमबाज ठरलेल्या राहीने तिने अंतिम दहा प्रयत्नांत आठ गुण घेत युक्रेनच्या ओलेन कॉस्तेविच हिला 38-37 मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. अखेरच्या फैरीत दुसऱ्या प्रयत्नात चूक झाल्यावर राही शांत राहिली. तिने सलग दोन गुण घेत ओलेनला मागे टाकले. अखेरच्या शॉटस्‌ला दोघींनाही गुण मिळाला नाही आणि राहीचे सुवर्णपदक निश्‍चित झाले; तसेच तिने भारतास ऑलिंपिक पात्रताही मिळवून दिली. 

सौरभचे जागतिक विक्रमासह सुवर्ण 
सतरावर्षीय सौरभ चौधरीने जागतिक वरिष्ठ; तसेच कुमार गटातील विक्रम मोडीत काढत दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्याने दिल्ली स्पर्धेत नोंदवलेला 245 गुणांचा विक्रम मोडीत काढताना 246.3 गुणांचा वेध घेतला. त्याचा कुमार गटातील जागतिक विक्रम 245.5 गुणांचा होता. दुसऱ्या फैरीपासून आघाडी घेतलेल्या या नवोदित नेमबाजाने वयास साजेशी परिपक्वता दाखवली आणि वरिष्ठ गटातील तिसरे सुवर्णपदक जिंकले. त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदकाचा वेध घेतला होता. पात्रता फेरीत दुसऱ्या असलेल्या सौरभने रशियाचा आर्तेम चेरनौससोव आणि चीनचा वेई पेंग यांना मागे टाकत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारताच्या शाहझार रिझवी यानेही अंतिम फेरी गाठली होती; पण तो पाचवा आला. 


​ ​

संबंधित बातम्या