बजरंगच्या पंक्तीत आलो याचा अभिमान ः रवी कुमार

वृत्तसंस्था
Saturday, 21 September 2019

-जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेतून ऑलिंपिक पात्रता सिद्ध करू शकलो, तसेच ब्रॉंझपदकाची कमाई केली याचा आनंद

- बजरंग पुनियाच्या पंक्तीत येऊन बसलो याचा अभिमान वाटतो,

-मोठा भाऊ अमितकुमार याच्याकडूनच कुस्तीची प्रेरणा मिळाली

नूर सुलतान (कझाकस्तान) ः जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेतून ऑलिंपिक पात्रता सिद्ध करू शकलो, तसेच ब्रॉंझपदकाची कमाई केली याचा आनंद आहेच. पण, त्यापेक्षा बजरंग पुनियाच्या पंक्तीत येऊन बसलो याचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया भारताचा ब्रॉंझपदक विजेता रवीकुमार दहिया याने व्यक्त केली. 
रवीने माजी जगज्जेत्या युकी ताकाहाशी याचा पराभव करून ऑलिंपिकसाठी पात्रता सिद्ध केली. तो म्हणाला,""देशासाठी पदक मिळवू शकलो आणि ऑलिंपिकमध्ये प्रवेश करू शकलो ही बाब माझ्यासाठी अभिमानाची आहे. त्याचबरोबर आता माझे नाव बजरंग पुनियाच्या साथीत घेतले जाईल यापेक्षा वेगळा आनंद तो काय सांगावा.'' 
जागतिक स्पर्धेतून विनेश फोगट, बजरंग पुनिया या अन्य दोन मल्लांनी ऑलिंपिक पात्रता सिद्ध केली आहे. रवीकुमार म्हणाला,""देशातील वरिष्ठ सहकाऱ्यांबरोबर आता माझे नाव घेतले जाणार. इथपर्यंत येण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. जागतिक स्पर्धा तर आता पार पडली. यापुढे ऑलिंपिक पदक हे एकच लक्ष्य आणि त्यासाठी आतापासून तयारीला लागणार. अर्थात, इथेच मला थांबायचे नाही. मला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.'' 
मोठा भाऊ अमितकुमार याच्याकडूनच कुस्तीची प्रेरणा मिळाली असे सांगून रवी कुमार म्हणाला,""अमित अनुभवी कुस्तीगीर आहे. त्याच्याकडून प्रेरणा तर मिळालीत, बरोबरीने खूप शिकायलाही मिळाले. आम्ही एकत्रच सराव करतो. अनेकदा तो मला मार्गदर्शनही करतो. त्याच्याकडे काही विचारायला गेल्यास तो कधीच नकार देत नाही. तो मला नेहमीच सल्ला देण्यासाठी तयार असतो.'' 


​ ​

संबंधित बातम्या