जागतिक महिला बॉक्‍सिंग - भारताच्या विजयी मोहिमेस जमुना बोरोकडून प्रारंभ

वृत्तसंस्था
Friday, 4 October 2019

- जमुना बोरो हिने जागतिक महिला बॉक्‍सिंगमधील भारताच्या मोहिमेस विजयी सुरुवात केली

- जमुनाने मंगोलियाच्या मिचिदमा एर्देनेदालाई हिच्याविरुद्ध 5-0 असा कौल मिळवला

- बावीस वर्षीय जमुना प्रथमच जागतिक स्पर्धेत खेळत आहे. त्याचे दडपण मात्र तिच्या खेळात जाणवले नाही. दुसऱ्या फेरीत अचूक पंच आणि जॅब्ज देत तिने हुकमत घेतली

मुंबई - जमुना बोरो हिने जागतिक महिला बॉक्‍सिंगमधील भारताच्या मोहिमेस विजयी सुरुवात केली. तिने उलान-उदे (रशिया) येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत 54 किलो गटात उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 
जमुनाने मंगोलियाच्या मिचिदमा एर्देनेदालाई हिच्याविरुद्ध 5-0 असा कौल मिळवला. जमुनाची सुरुवात संथ होती, तिने प्रतिस्पर्धीच्या खेळाचा अभ्यास केला आणि त्यानंतरच्या फेऱ्यात हुकमत राखत एकतर्फी कौल मिळवला. आसाम रायफलच्या सेवेत असलेल्या जमुनासमोरील आगामी आव्हान खडतर आहे. तिची उपांत्यपूर्व फेरीसाठी लढत पाचव्या मानांकित क्विदाद स्फोऊह हिच्याविरुद्द आहे. क्विदादने दोन वर्षांपूर्वीच्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. 
बावीस वर्षीय जमुना प्रथमच जागतिक स्पर्धेत खेळत आहे. त्याचे दडपण मात्र तिच्या खेळात जाणवले नाही. दुसऱ्या फेरीत अचूक पंच आणि जॅब्ज देत तिने हुकमत घेतली आणि तिसऱ्या फेरीत जोरदार आक्रमण करीत पंचांना आपल्याच बाजूने एकतर्फी कौल देण्यास भाग पाडले. माजी राष्ट्रीय विजेती नीरजा (75 किलो) आणि स्वीटी बुरा (75 किलो) यांची मोहीम शनिवारी सुरू होईल. नीरजाची प्रतिस्पर्धी चीनची आहे, तर स्वीटीची मंगोलियन. या स्पर्धेत 54 देशांतील 224 बॉक्‍सरचा सहभाग आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या