चॅम्पियन्स लीग - रेयालने हार टाळली; रोनाल्डोचा गोल

वृत्तसंस्था
Thursday, 3 October 2019

- दोन गोलच्या पिछाडीनंतर रेयाल माद्रिदने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत क्‍लब ब्रुगविरुद्धची हार टाळली

-  ख्रिस्तियानो रोनाल्डोचा यंदाच्या लीगमधील पहिला गोल हे युव्हेंटिसच्या बायर लिव्हरकुसेनविरुद्धच्या 3-0 विजयाचे वैशिष्ट्य ठरले. 

- रोनाल्डोने स्पर्धा इतिहासातील 127वा गोल केला असला, तरी गोंझालो हिगुएन हा विजयाचा शिल्पकार होता.

लंडन - दोन गोलच्या पिछाडीनंतर रेयाल माद्रिदने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत क्‍लब ब्रुगविरुद्धची हार टाळली. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा यंदाच्या लीगमधील पहिला गोल हे युव्हेंटिसच्या बायर लिव्हरकुसेनविरुद्धच्या 3-0 विजयाचे वैशिष्ट्य ठरले. 
विश्रांतीच्या दोन गोलच्या पिछाडीनंतर रेयालला वर्चस्वासाठी संघर्ष करावा लागला. कॅसेमीरो याने पाच मिनिटे असताना बरोबरीचा गोल केला. ही हार टाळल्यानंतरही रेयाल गटात तळाला आहे. या गटात पीएसजीने अव्वल क्रमांक राखताना गॅलातासारीचा 1-0 असा पराभव केला. 
रोनाल्डोने स्पर्धा इतिहासातील 127वा गोल केला असला, तरी गोंझालो हिगुएन हा विजयाचा शिल्पकार होता. त्याने एक गोल केला, तर दुसऱ्या गोलात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे जोरदार पावसात झालेल्या लढतीत विजय मिळविताना युव्हेंटिसला परिश्रम पडले नाहीत. 
बदली खेळाडू म्हणून आलेल्या रहिम स्टर्लिंग आणि फिल फॉडेन यांनी गोल करीत मॅंचेस्टर सिटीला दिनामो झॅग्रेबविरुद्ध 2-0 विजयी केले. स्टर्लिंग मैदानात येईपर्यंत सिटी चेंडूवरील वर्चस्वासाठीही झगडत होते. 
सर्जी गॅनबरी याच्या चार गोलमुळे बायर्न म्युनिकने गत उपविजेत्या टॉटनहॅमला 7-2 असे हरविले. हा प्रीमियर लीग संघाचा युरोपीय स्पर्धेतील घरच्या मैदानातील सर्वांत मोठा पराभव आहे. भरपावसात बायर्नने टॉटनहॅमचा बचाव खिळखिळा केला. साडेबारा अब्ज डॉलर मोजलेल्या जाओ फेलिक्‍सने अखेर ऍटलेटिकोकडून पहिला गोल केला. त्यांनी लोकोमोटीव मॉस्कोला 2-0 हरविले. माजी युरोपियन कपविजेत्या रेड स्टार बेलग्रेडने ऑलिम्पिकॉसला 3-1 असे हरविले. 


​ ​

संबंधित बातम्या