विश्‍वकरंडकाच्या चढाईबरोबरच पकडीचीही चर्चा

संजय घारपुरे
Saturday, 19 October 2019

- प्रो-कबड्डीचा मोसम संपत असतानाच भारतीय कबड्डी वर्तुळात विश्‍वकरंडक कबड्डी स्पर्धेच्या संयोजनाची चर्चा सुरू झाली. पण, त्याच वेळी ही स्पर्धा खरोखरच होऊ शकेल का, याबाबतही कबड्डीतील अनुभवी पदाधिकारी शंका घेत आहेत

- विश्‍वकरंडक स्पर्धा भारताबाहेर घेतल्यास त्यातील पाकिस्तानच्या सहभागात प्रश्‍न येणार नाहीत. सध्या तरी कबड्डी पदाधिकारी आशियाई देशांचा विचार करीत आहेत

अहमदाबाद - प्रो-कबड्डीचा मोसम संपत असतानाच भारतीय कबड्डी वर्तुळात विश्‍वकरंडक कबड्डी स्पर्धेच्या संयोजनाची चर्चा सुरू झाली. पण, त्याच वेळी ही स्पर्धा खरोखरच होऊ शकेल का, याबाबतही कबड्डीतील अनुभवी पदाधिकारी शंका घेत आहेत. जागतिक कुमार कबड्डी स्पर्धेत भारत सहभागी होणार नसल्यामुळे विश्‍वकरंडक स्पर्धेबाबत काय निर्णय असेल, याचीही चर्चा कबड्डी वर्तुळात सुरू आहे. 

विश्‍वकरंडक कबड्डी स्पर्धा पुढील मार्चपासून जूनपर्यंत कधीही होऊ शकेल, याची चर्चा प्रो-कबड्डीचा सध्या सुरू असलेला मोसम निम्म्यावर आल्यापासून सुरू आहे. त्या वेळी ही स्पर्धा मे महिन्यात होईल, त्याच वेळी स्पर्धा भारताबाहेरही असेल, असेही पदाधिकारी सांगत होते. मात्र आता तेच पदाधिकारी या स्पर्धेच्या आयोजनाबाबत साशंक झाले आहेत. भारतीय कबड्डी महासंघावर सध्या प्रशासक नियुक्त आहेत. त्यांनी जागतिक कुमार कबड्डी स्पर्धेतील भारताच्या सहभागास परवानगी नाकारली असल्याचे आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत यांनी सांगितले आहे. 
इराणमधील जागतिक कुमार कबड्डी स्पर्धा 4 ते 9 नोव्हेंबरला होणार आहे. पण ही स्पर्धा भारताचा सहभाग निश्‍चित करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्‍यता आहे. अर्थात इराणने याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. जागतिक कुमार कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय कबड्डी संयोजनाची आपलीही ताकद आहे हे दाखवण्यास इराण उत्सुक आहे, पण या स्पर्धेत भारत खेळल्यासच त्यास प्रतिसाद लाभेल, याची इराणला जाणीव आहे. नेमके हेच जागतिक कबड्डी स्पर्धेच्या संयोजनाबाबत घडले आहे. 
आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचा प्राथमिक कार्यक्रम तयार करताना नोव्हेंबरमध्ये जागतिक कुमार कबड्डी होईल. यातील मुलांची स्पर्धा इराणमध्ये, तर मुलींची स्पर्धा मलेशियात घेण्याचे ठरले होते. मुलांच्या स्पर्धेतील भारताचा सहभाग अनिश्‍चित आहे, तर मुलींच्या स्पर्धेबाबत अजून फार चर्चा नाही. त्यानंतर पुढील वर्षीच्या (2020) मार्चमध्ये आशियाई कबड्डी, तर त्यानंतर विश्‍वकरंडक कबड्डी घेण्याचे ठरले होते. आता विश्‍वकरंडक तसेच आशियाई स्पर्धेपैकी किमान एक स्पर्धा आपणास द्यावी यासाठी बांगलादेश आग्रही आहे. त्यांची पसंती विश्‍वकरंडक स्पर्धेसच असल्याचे सांगितले जात आहे. ही स्पर्धा न मिळाल्यास बांगलादेश आशियाई स्पर्धेच्या संयोजनास तयार होईल, असे कबड्डी पदाधिकारी सांगतात. 
विश्‍वकरंडक स्पर्धा भारताबाहेर घेतल्यास त्यातील पाकिस्तानच्या सहभागात प्रश्‍न येणार नाहीत. सध्या तरी कबड्डी पदाधिकारी आशियाई देशांचा विचार करीत आहेत. मध्य पूर्व देशांबरोबरच मलेशिया, थायलंड, इंडोनेशियाबाबतही विचार सुरू आहे. मात्र ही स्पर्धा घेताना अन्य खेळांच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचाही विचार होईल. त्यानंतरच तारखा आणि ठिकाणाबाबत निर्णय होईल. मात्र भारतीय कबड्डी महासंघाची सूत्रे अजूनही प्रशासकांकडे आहेत. महासंघाच्या निवडणुकीबाबतचा निर्णय न्यायालय घेईल. महासंघाची निवडणूक होऊन कबड्डी पदाधिकाऱ्यांकडे सूत्रे आल्यास आशियाई तसेच विश्‍वकरंडक कबड्डी स्पर्धा सहभागाबाबत कोणताही प्रश्‍न नसेल, पण प्रशासकांकडेच सूत्रे असल्यास काय होईल, याबाबत कोणीच अंदाज वर्तवण्यास तयार नाही. ते काय निर्णय घेतील हे कसे सांगता येईल, असेच अनेक पदाधिकारी सांगतात. 
 


​ ​

संबंधित बातम्या