देवधर करंडक - भारत "ब' संघाला विजेतेपद

वृत्तसंस्था
Monday, 4 November 2019

- केदार जाधव आणि शाहबाज नदिम यांच्या परिपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारत "ब' संघाने सोमवारी देवधर करंडक पटकावला

- अंतिम सामन्यात त्यांनी भारत "क' संघाचा 51 धावांनी पराभव केला. 

- देवधर करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी "क' संघाचा कर्णधार म्हणून शुभमन गिल मैदानात उतरला, तेव्हा त्याने विराट कोहलीचा सर्वांत युवा कर्णधाराचा विक्रम मोडला

 

रांची - केदार जाधव आणि शाहबाज नदिम यांच्या परिपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारत "ब' संघाने सोमवारी देवधर करंडक पटकावला. अंतिम सामन्यात त्यांनी भारत "क' संघाचा 51 धावांनी पराभव केला. 
भारत "ब' संघाने संथ सुरवातीनंतर 7 बाद 283 धावा केल्या. यात केदार जाधवच्या 86 धावांचा मोठा वाटा होता. त्यानंतर शाहबाज नदिमच्या गोलंदाजीने त्यांनी "क' संघाला 9 बाद 232 असे रोखले. नदिमने चार गडी बाद केले. 
प्रथम फलंदाजी करताना "ब' संघाने ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार पार्थिव पटेल यांना लवकर गमावले. तेव्हा त्यांची अवस्था 2 बाद 28 अशी होती. त्यानंतर यशस्विनी जैस्वाल याने 79 चेंडूंत संयमी 54 धावांची खेळी केली; पण त्यानंतर त्यांचा डाव निम्मी षटके झाली तेव्हा 4 बाद 92 असा अडचणीत होता. त्या वेळी केदारने 79, 74 आणि 31 धावांच्या तीन महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. त्याला नितीश राणा (20), विजय शंकर (45) आणि के. गौतम (35 नाबाद) यांची सुरेख साथ मिळाली. केदारने 84 चेंडूंत 4 चौकार, 4 षटकारांसह 86 धावांची खेळी केली. 
आव्हानाचा पाठलाग करताना "क' संघ पीयूष गर्ग (74), अक्षर पटेल (38), जलज सक्‍सेना (37) आणि मयांक मार्कंडे (27) यांच्या प्रयत्नांनंतरही विजयापर्यंत पोचण्यास अपयशी ठरला. शाहबाजच्या फिरकीने त्यांना रोखले. त्याने 32 धावांत 4 गडी बाद केले. 
संक्षिप्त धावफलक 
भारत "ब' 50 षटकांत 7 बाद 283 (केदार जाधव 86 -94 चेंडू, 4 चौकार, 4 षटकार, यशस्विनी जैस्वाल 54 -79 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, विजय शंकर 45, के. गौतम नाबाद 35, ईशान पोरेल 5-43) वि.वि. भारत "क' 50 षटकांत 9 बाद 232 (पीयूष गर्ग 74 -77 चेंडू, 8 चौकार, 1 षटकार, अक्षर पटेल 38, जलज सक्‍सेना 37, शाहबाज नदिम 4-32, महंमद सिराज 2-43) 
-------------------------- 
शुभमनने मोडला कोहलीचा विक्रम 
देवधर करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी "क' संघाचा कर्णधार म्हणून शुभमन गिल मैदानात उतरला, तेव्हा त्याने विराट कोहलीचा सर्वांत युवा कर्णधाराचा विक्रम मोडला. देवधर स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोहलीने नेतृत्व केले तेव्हा तो 21 वर्षे 142 दिवसांचा होता. शुभमनने 20व्या वर्षीच अंतिम सामन्यात नेतृत्व केले. 


​ ​

संबंधित बातम्या