आता अनुभवा खो-खो लीगचाही थरार

ज्ञानेश भुरे
Wednesday, 3 April 2019

भारतीय खो-खो महासंघाच्या वतीने मंगळवारी झाकोळत चाललेल्या खो-खो खेळाला नव संजीवनी देण्यासाठी पहिल्या खो-खो लीगची घोषणा केली. 'अल्टिमेट खो-खो' या नावाने ही लीग ओळखली जाणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय खो-खो महासंघाच्या वतीने मंगळवारी झाकोळत चाललेल्या खो-खो खेळाला नव संजीवनी देण्यासाठी पहिल्या खो-खो लीगची घोषणा केली. 'अल्टिमेट खो-खो' या नावाने ही लीग ओळखली जाणार आहे. मात्र, ही लीग कधी होणार, या विषयी थेट माहिती देण्यात आली नसली, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये ही लीग अपेक्षित आहे.

खो-खो महासंघाच्या साथीत डाबर कंपनीचे उपाध्यक्ष अमित बर्मन वैयक्तिक पातळीवर ही लीग घेणार आहेत. "आयपीएल'च्या धर्तीवर ही लीग 21 दिवसांची राहणार असून, आठ फ्रॅंचाईजी संघ एकूण 60 सामने खेळणार आहेत. ही लीग दुहेरी राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविण्यात येईल.

या लीगमध्ये 18 वर्षांखालील खेळाडूंना देखील सामावून घेतले जणार आहे. युवा खेळाडू तयार करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. लीगच्या घोषणेच्या कार्यक्रमास केंद्रिय क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी व्हिडियोद्वारे शुभेच्या दिल्या. ते म्हणाले, "या लीगमुळे स्थानिक खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. भारतीय खेळ असल्यामुळे या लीगला चांगली लोकप्रियता मिळेल.''

या लीगसाठी तेन्झिंग नियोगी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव आणि खो-खो संघचटनेचे माजी सचिव राजीव मेहता लीगचे कार्याध्यक्ष असतील.
आशियाई ऑलिंपिक समितीने खो-खो खेळास मान्यता दिली असल्यामुळे या खेळाचा आशियाई स्पर्धेत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राजीव मेहता म्हणाले, "भारत 2032 ऑलिंपिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी उत्सुक आहे. भारताला हा मान मिळाल्यास यजमान देश दोन ते तीन खेळांचा समावेश करू शकतो. त्या वेळी आम्ही खो-खो, कबड्डी या खेळांना प्राधान्य देऊ.''

खो-खो संघटनेचे अध्यक्ष सुधांशु मित्तल म्हणाले, "खो-खो साधारण 20 देशांत खेळला जातो. यात आशियाई देशांची संख्या अधिक आहे. लीगमधील सामने खास तयार करण्यात आलेल्या मॅटवर खेळविले जातील.''

ड्राफ्ट पद्धतीने खेळाडूंची निवड
लीगसाठी देशभरातून खेळाडूंची निवड ड्राफ्ट पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये भारतासह प्रामुख्याने इंग्लंड, दक्षिण कोरिया, इराण, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका या देशातील खेळाडूंचा समावेश असेल.

आम्हाला स्वदेशी खेळांची मोट बांधायची आहे. त्याची ही सुरवात असून, देशात खो-खो खेळाने गमावलेली प्रतिष्ठा आम्हाला परत मिळवून द्यायची आहे. यासाठी हा एक प्रयत्न असेल.
राजीव मेहता, भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव


​ ​

संबंधित बातम्या