मुंबई : प्रस्तावित खो-खो लीग टीव्हीसाठी जास्त आकर्षित करण्यासाठीच्या प्रयोगावर यापूर्वीच चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसार प्रस्तावित खो-खो लीगमधील सामना चारऐवजी सहा डावांचा असेल. त्याचबरोबर हे डाव पारंपरिक नऊऐवजी सात मिनिटांचे असतील, असे भारतीय खो-खो महासंघातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
खो-खो लीगसाठी आम्ही खेळात वेगवेगळे प्रयोग करण्याचा विचार करीत आहोत. सर्वप्रथम म्हणजे पुरस्कर्त्यांच्या जाहिरातीसाठी एक डाव नऊऐवजी सात मिनिटांचा करण्याचा विचार करीत आहोत. मात्र, लढतीचा वेळ खूपच कमी होऊ नये, यासाठी लढत चारऐवजी सहा डावांची असेल. आम्ही याबाबतचा प्रयोग मुंबईत, तसेच रत्नागिरीत करून बघितला आहे. त्याचे खो-खो रसिकांनी स्वागत केले होते. ही संकल्पना आम्ही भारतीय खो-खो महासंघासमोर मांडली होती, असे राज्यातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
नाशिकला पसंती?
भारतीय खो-खो महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी लीगमध्ये पुणे आणि बंगळूरचे संघ निश्चित असतील. त्याचबरोबर महाराष्ट्रातील एक संघ निश्चित असेल, असे सांगितले. या पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये चिखलात खेळला जाणारा खो-खो पाहण्यासाठी गर्दी होते, असे ठिकाण दुर्लक्षित कसे करणार, अशी विचारणा केली आहे.
त्याचबरोबर मुंबईतील बंदिस्त स्टेडियमचे भाडे खूपच जास्त आहे. त्या तुलनेत नाशिक नक्कीच आवाक्यातील आहे, याकडे लक्ष वेधले. एका पदाधिकाऱ्याने याच कारणास्तव मुंबईतील प्रो-कबड्डीचा संघ आपला बेस मुंबईबाहेर नेण्याचा विचार करीत होता, याकडे लक्ष वेधले.
बदल कशासाठी
-आक्रमणासाठी बारा खेळाडू असतील, तर संरक्षणासाठीदेखील तेवढेच असावेत
-संरक्षणासाठी त्यामुळे तीनऐवजी चार तुकड्या धावतील
-सर्व खेळाडूंना संरक्षणाची संधी मिळावी, यासाठी दुसऱ्या डावात दुसरी तुकडी करणार सुरवात
-दुसरी तुकडी कोणती यावर विचार सुरू, पहिल्या डावातील नाबाद तुकडीने सुरवात करावी असा प्रयत्न