किंग्ज इलेव्हनचे मालक म्हणतात कुंबळे म्हणजे so cool
अ
मोहाली - टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना आयपीएलसाठी करारबद्ध केल्यामुळे किंग्ज इलेव्हन फ्रॅंचायजीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यांच्याशी तीन वर्षांचा करार करण्यात आला असून जेतेपदाची प्रतीक्षा संपुष्टात येण्याची किंग्ज इलेव्हनला आशा आहे.
किंग्ज इलेव्हनचे सहमालक नेस वाडिया यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, कुंबळे म्हणजे जणू काही ताज्या हवेची झुळूकच. तो so cool आहे. त्याच्यासारख्या शांत आणि अविचल मार्गदर्शकाशी नाते जुळणे आमचे सुदैव आहे. तो सुद्धा याकडे एक मोठी संधी म्हणून पाहतो आहे. फ्रॅंचायजीला क्षमतेनुसार कामगिरी साध्य करून देण्याचा त्याचा मानस आहे. गेल्या दोन मोसमांमध्ये आम्ही पहिल्या टप्यात सर्वोत्तम संघ होतो, पण नंतर काहीतरी होऊन दुसऱ्या टप्यात आम्ही एकाग्रता आणि लय गमावली. खरोखर काय घडले हे मला माहीत नाही.
मुंबई इंडियन्स, आरसीबीचेही मेंटॉर
कुंबळेने 2017च्या आयसीसी चॅंपियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाचे मार्गदर्शकपद सोडले. कर्णधार विराट कोहली याच्याशी त्याचे गंभीर मतभेद झाले. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) या संघांचे मेंटॉर म्हणूनही काम केले आहे.
कुंबळे संघात आणतील शांतता अन्् शिस्त
वाडिया म्हणाले की, कुंबळे संघात नक्कीच बरीचशी शांतता आणि शिस्त आणतील. अवास्तव प्रयत्न न करतास्वतःच्या गुणवत्तेला कमाल न्याय देण्यास ते खेळाडूंना प्रेरित करतील. त्यांचा प्रशिक्षणाचा अनुभव विपुल आहे, जो आम्हाला प्रचंड उपयुक्त ठरेल. आमचा करार तीन वर्षांचा आहे आणि आम्ही त्या पलीकडे एकत्र राहण्याची आशा बाळगली आहे.