किंग्सलेच्या गोलमुळे चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बायर्न म्युनिच विजयी  

टीम ई-सकाळ
Monday, 24 August 2020

पोर्तुगालमधील लिस्बन येथील एस्टाडियो दे लुझ स्टेडियमवर झालेल्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बायर्न म्युनिच संघाने विजय मिळवला आहे.

पोर्तुगालमधील लिस्बन येथील एस्टाडियो दे लुझ स्टेडियमवर झालेल्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बायर्न म्युनिच संघाने विजय मिळवला आहे.  यापूर्वी पाच वेळा विजेते असलेल्या बायर्नने 2013 नंतर प्रथमच यंदाच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. व त्यानंतर बायर्न म्युनिचने पॅरिस सेंट-जर्मन (पीएसजी) संघाला 1 - 0 ने पराभूत करत, सहाव्यांदा चॅम्पियन्स लीग स्पर्धेचा खिताब मिळवला आहे. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या सामन्याच्या वेळेस प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता. 

धोनीच्या फेअरवेल सामन्यासाठी बीसीसीआय तयार 

बायर्न म्युनिच आणि पीएसजी यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत, खेळाच्या पहिल्या सत्रात कोणत्याच संघाला गोल नोंदवता आला नाही. मात्र त्यानंतर बायर्न म्युनिच संघाच्या किंग्सलेय कोमनने 59 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. व यानंतर सामना संपेपर्यंत कोणत्याच संघाने गोल केला नाही. त्यामुळे बायर्न म्युनिच संघाने चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पीएसजी संघावर  1 - 0 ने विजय मिळवला. पीएसजीचा संघ प्रथमच चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहचला होता. परंतु या पराभवामुळे पीएसजीने आपण युरोपिय फुटबॉलमध्येही सर्वोत्तम संघ आहोत हे दाखवण्याची संधी गमावली आहे. तर बायर्न म्युनिच संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. त्यामुळे बायर्न म्युनिच हा यूरोपियन देशांमध्ये एक सुद्धा सामना न गमावणार पहिला संघ ठरला आहे.  

यापूर्वी, पीएसजी आणि लेपझिग यांच्यात झालेल्या सेमीफायनल सामन्यात पीएसजीने धमाकेदार विजय मिळवला होता. पीएसजी या फ्रान्समधील अव्वल फुटबॉल संघाने 110 चँपियन्स लीग सामन्यांच्यानंतर युरोपमधील या प्रतिष्ठित फुटबॉल क्लब स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच प्रवेश केला होता. तर बायर्नने याआधीच्या सामन्यात बार्सिलोनाविरुद्ध 8 - 2 बाजी मारताना आपली ताकद दाखवली होती. बायर्न म्युनिच संघाने 1974, 1975, 1976 मध्ये सलग तीन वेळेस चॅम्पियन्स लीग स्पर्धेचा खिताब पटकावला होता. यानंतर 2001 आणि 2013 मध्ये बायर्न म्युनिचने चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या खिताबावर मोहोर उठविली होती. यंदाच्या हंगामात देखील बायर्न म्युनिचने खिताब मिळवत लिव्हरपूल संघाशी बरोबरी साधली आहे. दरम्यान, रिअल माद्रिदने 13 वेळेस व मिलानने 7 वेळेस या स्पर्धेचा खिताब मिळवलेला आहे.       

चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हे विशेष होते - 
- पीएसजीचे युरोपिय मानांकन पाच, तर बायर्नचे दोन. 
- 1998 नंतर प्रथमच चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीतील दोनही संघ राष्ट्रीय लीगचे          विजेते 
- प्रतिस्पर्धी संघाचे मार्गदर्शक मूळचे जर्मनीतील 
- पीएसजीचे मार्गदर्शक थॉमस टशेल यांनी यापूर्वी बोरुसिया डॉर्टमंड या बायर्नच्या          पारंपारीक प्रतिस्पर्ध्यांना मार्गदर्शन केले आहे     


​ ​

संबंधित बातम्या