निखत चाचणी वादात क्रीडामंत्री म्हणतात देशाच्या हिताचा निर्णय घ्यावा

वृत्तसंस्था
Saturday, 19 October 2019

- निखत झरीन आणि मेरी कोम यांच्यात चाचणी लढतीच्या वादात , देशाच्या हिताचा निर्णय घ्यावा, इतकी विनंती भारतीय बॉक्‍सिंग महासंघाला करू शकतो, अशी स्पष्ट भूमिका क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी शुक्रवारी घेतली. 

- निखतच्या या भूमिकेस भारताचा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने पाठिंबा दिला आहे

नवी दिल्ली -  ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी संघ निवडण्यापूर्वी निखत झरीन आणि मेरी कोम यांच्यात चाचणी लढत व्हावी की नाही यासंदर्भात आपण थेट सहभाग घेऊ शकत नाही. पण, देशाच्या हिताचा निर्णय घ्यावा, इतकी विनंती भारतीय बॉक्‍सिंग महासंघाला करू शकतो, अशी स्पष्ट भूमिका क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी शुक्रवारी घेतली. 
जागतिक स्पर्धेप्रमाणेच ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसही मेरी कोमला थेट संघात निवडण्याचा विचार भारतीय बॉक्‍सिंग महासंघ करत आहे. या संदर्भात संघ निवडण्यापूर्वी मेरीबरोबर आपली चाचणी व्हावी, अशी विनंती निखत झरीनने पत्राद्वारे क्रीडामंत्र्यांना केली होती. 
मात्र, आपण या वादात थेट सहभाग घेऊ शकत नाही. हा ऑलिंपिक चळवळीचा अवमान ठरेल असे सांगत रिजीजू यांनी थेट वादात पडण्यास नकार दिला. मात्र, त्याचवेळी देश, खेळ आणि खेळाडू यांच्या हिताचा निर्णय महासंघाने घ्यावा, असे आपण नक्की सांगू, असे उत्तर रिजीजू यांनी निखत हिला ट्‌विटरच्या माध्यमातून दिले आहे. 
ऑलिंपिक पात्रतेसाठी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या खेळाडूचीच थेट निवड करण्यात येईल, असे भारतीय बॉक्‍सिंग महासंघाने स्पष्ट केले आहे. मेरीला जागतिक स्पर्धेत ब्रॉंझपकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे आता 51 किलो वजनी गटाच्या निवडीसाठीदेखील चाचणी व्हावी, अशी निखतची मागणी आहे. जागतिक स्पर्धेसाठी संघ निवडताना मेरीला थेट प्रवेश देण्यात आला होता. तेव्हादेखील ऐनवेळी निखतला चाचणी रद्द झाल्याचे कळविण्यात आले होते. 
रिजीजू यांच्या ट्‌विटनंतर निखतशी संपर्क साधला असता, तिने या प्रकरणात योग्य निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. निखत हिने या वेळी रिजीजू यांचे आभार मानले. ती म्हणाली, ""माझ्या पत्राची तातडीने दखल घेतल्याबद्दल तुमचे आभार. देशासाठी सर्वस्व पणाला लावण्यास तयार असणाऱ्या खेळाडूंच्या बाबतीत अन्याय होणार नाही आणि एखाद्यास झुकते माप मिळू नये इतकी माझी अपेक्षा आहे.'' 
निखतच्या या भूमिकेस भारताचा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने पाठिंबा दिला आहे. निखतची भूमिका योग्य आणि विचार करण्यासारखी आहे. नियम हे सर्व खेळाडूंसाठी सारखे असतात, असे त्याचे म्हणणे आहे. 
----------------- 
महासंघाची भूमिका गुलदस्तात 
प्रथम निखत आणि लगेच क्रीडामंत्री यांची या वादात भूमिका स्पष्ट झाली असली तरी, भारतीय बॉक्‍सिंग महासंघाने अजून आपली भूमिका मांडलेली नाही. अर्थात महासंघाने गेल्या वर्षीपासून गुणांवर आधारित निवड पद्धती सुरू केली आहे. त्यानुसार विविध मानांकन स्पर्धेतील कामगिरीनुसार खेळाडूची निवड करण्यात येते. जर एखाद्या वजन गटात प्रशिक्षक आणि निवड समितीला स्पर्धा खूपच असल्याचे वाटले तरच निवड चाचणी लढत घेण्यात येते. 


​ ​

संबंधित बातम्या