मुलींची क्रिकेट स्पर्धा : मध्य प्रदेशच्या निकिताची दमदार फलंदाजी; विदर्भाचा एका विकेटने पराभव 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 March 2019

निकिता सिंगच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मध्य प्रदेशने 23 वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत यजमान विदर्भाचा एका विकेटने पराभव केला. यजमान संघाचा हा सहा सामन्यातील पाचवा पराभव होय. 

नागपूर : निकिता सिंगच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मध्य प्रदेशने 23 वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत यजमान विदर्भाचा एका विकेटने पराभव केला. यजमान संघाचा हा सहा सामन्यातील पाचवा पराभव होय. 

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर झालेल्या या सामन्यात विदर्भाचा डाव 107 धावांवर गुंडाळल्यानंतर मध्य प्रदेशने तीन चेंडू शिल्लक असताना 108 धावा करीत विजय मिळविला. विदर्भाकडून लतिका इनामदार, ए. जे. भोंगाडे, वैष्णवी खंडकर, नूपुर कोहळे या चार फलंदाजांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. लतिका आणि भोंगाडेने 29 धावांची सलामी भागीदारी केल्यानंतर विदर्भाच्या इतर फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्या. 

मध्य प्रदेशची सुरुवात डळमळीत झाली. 11 षटकात त्यांच्या फक्त 18 धावा फलकावर लागल्या होत्या. 12 व्या षटकात त्यांनी तीन विकेट गमाविल्या. त्यांचा निम्मा संघ 31 धावांत गारद झाल्यानंतरही विदर्भाला सामना जिंकता आली नाही. निकिता सिंगने दमदार फलंदाजी करीत विदर्भाकडून विजय हिरावून घेतला. तिने प्रथम सलोनी डांगोरेसोबत सहाव्या गड्यासाठी 30 तर सातव्या गड्यासाठी अनन्या दुबेसोबत 32 धावांची भागीदारी केली. निकिताने 67 चेंडूंचा सामना करताना पाच चौकार मारले. विदर्भाचा पुढील सामना तीन मार्च रोजी त्रिपुराविरुद्ध व्हीसीए सिव्हिल लाइन्स येथे होईल. 

संक्षिप्त धावफलक : विदर्भ 47.5 षटकात सर्वबाद 107 (लतिका इनामदार 17, ए. एस. भोंगाडे 12, वैष्णवी खंडकर 16, नूपुर कोहळे 29, भारती चौधरी 3-23, चारू जोशी 2-15, सलोनी डांगोरे 2-12, पूनम सोनी 1-18, सौम्या तिवारी 1-17) मध्य प्रदेश 49.3 षटकात 9 बाद 108 (सोनिया शर्मा 15, निकिता सिंग 46, अनन्या दुबे 11, वैष्णवी खंडकर 4-16, दिशा कासट 2-12, जी. वानकर 1-28, नूपुर कोहळे 1-21). 

स्मृती मानधना शून्यावर बाद 
कळमना मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने महाराष्ट्रावर 13 धावांवर मात केली. यात महाराष्ट्राची अव्वल खेळाडू आणि आयसीसी टी-20त तिसऱ्या स्थानावर असलेली स्मृती मानधना केवळ दोन चेंडू खेळून शून्यावर बाद झाली. क्षेत्ररक्षण करताना तिने दोन झेल घेतले. महाराष्ट्राचा पुढील सामना तीन तारखेला व्हीसीए जामठा येथे मध्य प्रदेशविरुद्ध होईल.


​ ​

संबंधित बातम्या