कुमार गट राष्ट्रीय खो-खो - महाराष्ट्राच्या संघांची अपेक्षित सुरवात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 October 2019

- महाराष्ट्राच्या मुले आणि मुलींच्या संघांनी सफाईदार विजयासह 39व्या कुमार गट राष्ट्रीय खो-खो स्पर्धेच्या आपल्या मोहिमेस धडाक्‍यात सुरवात केली.

- महाराष्ट्राने मुलांच्या गटात ओडिशाचा 16 - 9 असा एक डाव 7 गुणांनी धुव्वा उडवला

- मुलींच्या गटात महाराष्ट्राने गोव्याचा 18 - 3 असा एक डाव 15 गुणांनी पराभव केला

सुरत - महाराष्ट्राच्या मुले आणि मुलींच्या संघांनी सफाईदार विजयासह 39व्या कुमार गट राष्ट्रीय खो-खो स्पर्धेच्या आपल्या मोहिमेस धडाक्‍यात सुरवात केली. मुलांनी ओडिशा, तर मुलींनी गोव्याचा एकतर्फी वर्चस्व राखून पराभव केला. 
वीर नर्मद साऊथ गुजरात विद्यापीठ क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने ओडिशाचा 16 - 9 असा एक डाव 7 गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात महाराष्ट्राच्या नरेंद्र कातकडेने तीन मिनिटं तीस सेकंद संरक्षण केल, चंदू चावरेने नाबाद तीन मिनिटे दहा सेकंद बचाव केला. रामजी कश्‍यप याने 2.30 मिनिटे बचाव केल्यानंतर आक्रमणातही आपली छाप पाडली. त्याने पाच गडी बाद केले. सौरभ आहिर याचा अष्टपैलू खेळही उपयुक्त ठरला. त्याने 2.30 सेकंद बचाव करताना आक्रमणात दोन गडी बाद केले. ओडिशाकडून संजय मंडलने एक मिनिट तीस सेकंद संरक्षण केले. अर्जुन सिंगने चार गडी बाद केले. मात्र, महाराष्ट्राच्या अनुभवासमोर त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. 
मुलींच्या गटात महाराष्ट्राने गोव्याचा 18 - 3 असा एक डाव 15 गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात अनुभवी महाराष्ट्राच्या जान्हवी पेठे हिने चार मिनिटे संरक्षण करून सामन्याचा निकाल स्पष्ट केला. तिला ऋतुजा भोर हिने 3.10 मिनिटे बचाव करून सुरेख साथ केली. रितिका मगदूम व गौरी शिंदे या दोघींनी प्रत्येकी तीन गडी बाद करून गोवा संघाला खेळ दाखविण्याची संधीच दिली नाही. गोव्याकडून करिष्मा वेळीप हिने एकाकी लढत दिली. तिला अन्य खेळाडूंकडून साथ मिळाली नाही. 
अन्य निकाल - 
मुले - कोल्हापूर वि.वि. पश्‍चिम बंगाल (एका गुणाने), उत्तराखंड वि.वि दादरा-नगर हवेली (1 डाव 21 गुणांनी), केरळ वि.वि. मध्य भारत (1 डाव 2 गुणांनी), तमिळनाडू वि.वि. बिहार (1 डाव 16 गुणांनी) 
मुली ः कर्नाटक वि.वि. राजस्थान (1 डाव 10 गुणांनी), पश्‍चिम बंगाल वि.वि. बिहार (1 डाव 18 गुणांनी), त्रिपुरा वि.वि. दादरा-नगर हवेली (1 डाव 20 गुणांनी). 


​ ​

संबंधित बातम्या