कुमार राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत महाराष्ट्र उपविजेते

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 November 2019

-  महाराष्ट्राच्या मुलांनी कुमार राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत उपविजेतेपदाचा मान मिळविला.

- मुलांच्या 20 वर्षांखालील गटात महाराष्ट्राचा अभिषेक उभे आणि 18 वर्षांखालील गटात तेजस सिरसे यांची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली

- 20 वर्षांखालील मुलींच्या गटात तेलंगणाच्या जी. माहेश्‍वरी हिने 10मिनिट 34.10 सेकंद अशी सरस वेळ देत 3 हजार मीटर स्टिपलचेस शर्यतीत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.

गुंटुर -  महाराष्ट्राच्या मुलांनी कुमार राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत उपविजेतेपदाचा मान मिळविला. त्याचवेळी मुलांच्या 20 वर्षांखालील गटात महाराष्ट्राचा अभिषेक उभे आणि 18 वर्षांखालील गटात तेजस सिरसे यांची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. 
अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या रिया पाटिल हिने मुलींच्या 16 वर्षांखालील गटात 25.02 सेकंद वेळ देत 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळविले. मुलींच्याच 18 वर्षांखालील वयोगटात मधुरा शेट्टी हिने 7 मिनिट 22.80 सेकंद अशी वेळ 2000 मीटर स्टिपलचेस शर्यतीत सोनेरी कामगिरी केली. त्याचबरोबर प्रसाद अहिरे (200 मीटर), हर्षवर्धन भोसले (400 मीटर अडथळा), रुजुता शेंडे (3000 मीटर स्टिपलचेस), आर. जाना (200मीटर), यांनी रौप्य, तर सुहास बनकर (3000 मीटर स्टिपलचेस), सौरभ रावत (1500 मीटर), मोनू (3000 मीटर), ताई बाह्मणे (1500 मीटर), अनुज डेंगळे (हातोडाफेक), यांनी आपापल्या वयोगटातून ब्रॉंझपदक मिळविले. 
दरम्यान, 20 वर्षांखालील मुलींच्या गटात तेलंगणाच्या जी. माहेश्‍वरी हिने 10मिनिट 34.10 सेकंद अशी सरस वेळ देत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तिने नंदिनी गुप्ता (10 मिनिट 53.91 सेकंद) हिने 2017 मध्ये नोंदविलेला विक्रम 12.71 सेकंदांनी मोडला. या शर्यतीमधील खुशबू गुप्ता हिचा 10 मिनिट 55.54 सेकंदाचा स्पर्धा विक्रमही तिने मोडला. 
यजमान आंध्र प्रदेशाच्या नालुबोथू षण्मुगा श्रीनिवास याने 18 वर्षांखालील गटात200 मीटर शर्यत 21.34 सेकंदात जिंकताना स्पर्धा विक्रमाची नोंद केली. त्याने दिलेली वेळ याच शर्यतीत 20 वर्षांखालील गटातील विजेत्या अबिन देवाडिगापेक्षा वेगवान ठरली. 
मुलींच्या 18 वर्षांखालील गटात उत्तराखंडच्या अंकिता हिने 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत तिने 4 मिनिट 28.20 सेंकद अशी वेळ देत स्पर्धा विक्रम नोंदविला. या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमांची नोंद असलेल्या महाराष्ट्राच्या ताई बाह्मणे हिला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मुलींच्यात 16 वर्षांखालील गटात उत्तर प्रदेशाच्या प्रतिक्षा पटेल (43.08 मीटर) हिने भाला पेक प्रकारात स्पर्धा विक्रम नोंदविला. मुलांच्या 20 वर्षांखालील गटात तमिळनाडूच्या प्रविण चित्रावेल याने तिहेरी उडीत अपेक्षित यश मिळविले. त्याने 15.38 मीटरच्या उडीसह सुवर्णपदकाची कमाई केली. 
-------------- 


​ ​

संबंधित बातम्या