पिन्चॅक सिलॅटमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन ऑफ चॅम्पियन 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 July 2019

एक नजर

  • भोपाळ  येथे झालेल्या पिन्चॅक सिलॅट राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने सातव्यांदा पटकावला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन चषक
  • कोल्हापुरातील खेळाडूंना सर्वाधिक 14 पदके. 
  • उत्कृष्ट खेळाडूचा चषकही कोल्हापूरला
  • स्पर्धेत जम्मू-काश्‍मीर संघ दुसरा तर आसाम संघ तिसऱ्या क्रमांकावर. 

भोपाळ - येथे झालेल्या पिन्चॅक सिलॅट राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा चषक सातव्यांदा पटकावला. यात कोल्हापुरातील खेळाडूंनी सर्वाधिक 14 पदके मिळवून स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे उत्कृष्ट खेळाडूचा चषकही कोल्हापूरला मिळाला. या स्पर्धेत जम्मू-काश्‍मीर संघाने दुसरा तर आसाम संघाने तिसऱ्या क्रमांकाचा चषक मिळविला. 

भोपाळ येथे 12 वर्षाखालील व 12 ते 14 वयोगटातील मुलामुलींची पिन्चॅक सिलॅट राष्ट्रीय स्पर्धा झाली. या स्पर्धेत 31 राज्यांतील 954 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्रातील 65 मुला-मुलींचा संघ सहभागी झाला होता.

महाराष्ट्रातील खेळाडूंनी असोसिएशनचे महासचिव किशोर येवले यांच्या मार्गदर्शनाखाली 22 सुवर्ण, 11 रौप्य आणि15 कास्यपदके पटाकवली. यामध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी 7 सुवर्ण, 1 रौप्य आणि 6 रजत पदक मिळवून सर्वाधिक 14 पदके पटकाविली.

कोल्हापूरच्या ओबी बेंद्रे, श्‍वेता भोसले यानी गंडा इव्हेंटमध्ये सुवर्णपदकासह उत्कृष्ट खेळाडूचा चषक मिळविला. फाईट इव्हेंटमध्ये तनिष्का पाटील, सोहम भोसलेला सुवर्णपदक, ओबी बेंद्रे रौप्य तर मृदूला कांबळे, श्‍वेता भोसले, पृथ्वीराज वावरेला कास्य, तुंगल इव्हेंटमध्ये मृदूला कांबळे कास्य, गंडा इव्हेंटमध्ये श्‍वेता भोसले, ओवी बेंद्रे हिला सुवर्ण, तर शाहुराज फरांदे, पृथ्वीराज वावरेला कास्य, रेगू इव्हेंटमध्ये तनिष्का पाटील, मानसी बनगे, तनिष्का महामुलकर हिने सुवर्णपदक पटकाविले.

या खेळाडूंना प्रशिक्षक नितीन कांबळे यांचे मार्गदर्शन तर अमोल बांवडेकर यांचे सहकार्य लाभले. सर्व यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचा आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, पिन्चॅक सिलॅट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारत कोटकर, उपाध्यक्ष डॉ. विशाल कुमार धापटे आदींनी अभिनंदन केले.

पदक विजेत्या खेळाडूंची सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे. महाराष्ट्र संघात सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सिंधुदुर्ग, नवी मुंबई, ठाणे, नगर, नाशिक अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर आदी जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते. 

लकी ड्रॉ ही कोल्हापूरला 
स्पर्धेत भोपाळ येथील एल. एन.सी.टी. विद्यापीठ व ऑल इंडिया पिन्चॅक सिलॅट असोसिएशनतर्फे लकी ड्रॉ बक्षिसे ठेवण्यात आली होती. यातील पहिले बक्षीस कोल्हापूरच्या तनिष्का महामुलकरला मिळाले. 
 

 
 


​ ​

संबंधित बातम्या