23 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिंकदरला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 September 2019

- भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 23 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्राच्या सिकंदर शेख याने 92 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले.

-स्पर्धेत आज महाराष्ट्राच्या सुरज कोकाटे (61 किलो) आणि आबासाहेब अटकळे (57 किलो) यांनी अनुक्रमे रौप्य आणि ब्रॉंझपदक मिळविले.

पुणे - भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 23 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्राच्या सिकंदर शेख याने 92 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले. स्पर्धेत आज महाराष्ट्राच्या सुरज कोकाटे (61 किलो) आणि आबासाहेब अटकळे (57 किलो) यांनी अनुक्रमे रौप्य आणि ब्रॉंझपदक मिळविले. ही स्पर्धा शिर्डी येथे सुरू आहे. 
महाराष्ट्राला सिकंदरने सुवर्णपदक मिळवून देताना सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले. आक्रमकतेला संयमाची जोड देत त्याने हे यश मिळविले. अंतिम लढतीत त्याने हरियानाच्या सुनिलला 10-6 असे पराभूत केले. स्पर्धेत महाराष्ट्राला दुसऱ्या सुवर्णपदकाची संधी होती. मात्र, 61 किलो वजन गटात सूरज कोकाटेला अंतिम फेरीचा अडसर दूर करता आला नाही. त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सुवर्णपदकाच्या लढतीत त्याने सेनादलाच्या रविंदरला चांगलेच झुंजवले. मात्र, रविंदरचा बचाव मोडून काढण्यात त्याला यश आले नाही. त्याला अखेरीस 4-6 अशा पराभवाचा सामना करावा लागला. 
आबा अटकळे याने महारा÷ष्ट्राला 57 किलो वजन गटात ब्रॉंझपदक मिळवून दिले. ब्रॉंझपदकाच्या लढतीत गुजरातच्या राजकुमार यादवविरुद्ध सुरवातीला अटकळे पहिल्या फेरी अखेरीस 4-12 असा पिछाडीवर होता. मात्र, दुसऱ्या फेरीत अटकळे याने कमालीची आक्रमकता राखून प्रतिस्पर्ध्याला संधीच दिली नाही. तुफानी कुस्ती करत त्याने अखेरीस सर्व पिछाडी भरून काढत 15-12 असा विजय मिळविला. अटकळे मूळ सोलापूरचा असला, तरी तो पुण्यात काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात सराव करतो.


​ ​

संबंधित बातम्या