संतोष करंडक फुटबॉल - सेनादलाची आगेकूच, महाराष्ट्राचे पॅकअप
- संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश करण्यासाठी पश्चिम विभागीय फेरीच्या अ गटातील शेवटच्या साखळी लढतीत गतविजेत्या सेनादलास बरोबरी पुरेशी होती
- उत्तरार्धातील पेनल्टी फटक्यावर त्यांनी महाराष्ट्राला 1-1 असे गोलबरोबरीत रोखून आगेकूच राखली.
- बरोबरीनंतर सेनादल व महाराष्ट्राचे समान 10 गुण झाले, पण गोलसरासरीत सेनादल (+9) संघ महाराष्ट्राला (+6) भारी ठरला.
- अ गटातील औपचारिक ठरलेल्या आणखी एका सामन्यात लक्षद्वीपने दमण-दीव संघाला 3-1 फरकाने नमविले
पणजी - संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश करण्यासाठी पश्चिम विभागीय फेरीच्या अ गटातील शेवटच्या साखळी लढतीत गतविजेत्या सेनादलास बरोबरी पुरेशी होती. उत्तरार्धातील पेनल्टी फटक्यावर त्यांनी महाराष्ट्राला 1-1 असे गोलबरोबरीत रोखून आगेकूच राखली.
महाराष्ट्राला यंदा स्पर्धेच्या पश्चिम विभागीय फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्यांना गटातून पुढील फेरी गाठण्यासाठी विजय अत्यावश्यक होता. अ गटातून सेनादल, तर ब गटातून यजमान गोवा मुख्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. सोमवारच्या बरोबरीनंतर सेनादल व महाराष्ट्राचे समान 10 गुण झाले, पण गोलसरासरीत सेनादल (+9) संघ महाराष्ट्राला (+6) भारी ठरला.
धुळेर-म्हापसा येथील जीएफए स्टेडियमवर सोमवारी झालेल्या लढतीत सामन्याच्या दहाव्याच मिनिटास डिऑन मिनेझिस याने महाराष्ट्राला आघाडी मिळवून दिली. सामन्याच्याच्या 70व्या मिनिटापर्यंत ते आघाडीवर होते, पण सेनादलास पेनल्टी फटका मिळणे त्यांच्यासाठी महागात पडले. लाल्लाव्मकिमा याने स्पॉट किकवरून अचूक फटका मारत सेनादलास मुख्य फेरीत नेले.
पश्चिम विभागीय फेरीतील अ गट आपल्या संघासाठी आव्हानात्मक होता. आजच्या सामन्याच्या पूर्वार्धात महाराष्ट्राने तुल्यबळ खेळ केला, त्यांनी आघाडीही मिळविली. उत्तरार्धात आम्ही जोरदार मुसंडी मारत आवश्यक असलेली बरोबरी साधत मुख्य फेरी गाठली. संघातील खेळाडूंनी कौतुकास्पद खेळ केला, असे सेनादलाचे प्रशिक्षक परशुराम सलवादी यांनी सामन्यानंतर सांगितले.
अ गटातील औपचारिक ठरलेल्या आणखी एका सामन्यात लक्षद्वीपने दमण-दीव संघाला 3-1 फरकाने नमविले.