महाराष्ट्राने केले लक्षद्वीपला निष्प्रभ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 September 2019

संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या पश्चिम विभागीय फेरीत पहिल्या लढतीत विजय मिळविताना महाराष्ट्राला संघर्ष करावा लागला होता, मात्र मंगळवारी त्यांनी सफाईदार खेळ करताना लक्षद्वीपला 3-0 फरकाने निष्प्रभ केले.

पणजी -  संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या पश्चिम विभागीय फेरीत पहिल्या लढतीत विजय मिळविताना महाराष्ट्राला संघर्ष करावा लागला होता, मात्र मंगळवारी त्यांनी सफाईदार खेळ करताना लक्षद्वीपला 3-0 फरकाने निष्प्रभ केले.

अ गटातील आणखी एका सामन्यात दमण-दीवने गुजरातला 2-0 फरकाने हरविले. दमण-दीवचा पहिला गोल 24व्या मिनिटास सोहेल काठरी याने पेनल्टी फटक्यावर केला. 89व्या मिनिटास ब्रँडन डेव्हिड याने दुसरा गोल करून संघाला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला. आजचे दोन्ही सामने धुळेर-म्हापसा येथील जीएफए स्टेडियमवर झाले. 

महाराष्ट्राचा हा सलग दुसरा विजय ठरला. अगोदरच्या लढतीत त्यांनी दमण-दीवला 1-0 फरकाने हरविले होते. त्यांचे आता दोन लढतीतून सहा गुण झाले असून गटात अव्वल क्रमांक मिळाला आहे. दमण-दीवने तीन गुणांसह खाते उघडले आहे. गुजरातला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. अगोदरच्या लढतीत त्यांचा सेनादलाने 7-1 फरकाने घुव्वा उडविला होता.

यश म्हात्रे याने 11व्या मिनिटास महाराष्ट्रास आघाडी मिळवून दिली. नंतर उत्तरार्धातील खेळात तीन वेळच्या राष्ट्रीय विजेत्यांनी आणखी दोन गोल नोंदविले. कर्णधार अॅलन डायसने 53व्या, तर शेनॉन परेराने 82व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल करून विजयाचे तीन गुण पक्के केले.

दमण-दीवविरुद्ध बदली खेळाडूच्या रुपात मैदानात येत महत्त्वपूर्ण खेळ केलेल्या अद्वैत शिंदे याला आज स्टार्टिंग लाईन-अपमध्ये स्थान मिळाले. त्यामुळे अमन गायकवाडला विश्रांती देण्यात आली. पहिल्या गोलच्या वेळेस यश म्हात्रे याने रचलेल्या चालीवर प्रज्ञेश सोळंकी चेंडू कर्णधार अॅलनकडे दिला. यावेळी अॅलने स्वतः फटका न मारता पुढे आलेल्या यशला गोल करण्यासाठी शानदार क्रॉस पास पुरविला. दुसऱ्या गोलच्या वेळेस अॅलनने निखिल प्रभूच्या भेदक थ्रो-ईनवर प्रतिस्पर्धी गोलरक्षकास अजिबात संधी दिली नाही. सामना संपण्यास आठ मिनिटे असताना शेनॉनने जबरदस्त व्हॉली फटक्यावर संघाचा विजय निश्चित केला.

 


​ ​

संबंधित बातम्या