निवड समितीकडून माहीला निरोप?; धोनीचे नावही नाही घेतले

संजय घारपुरे
Sunday, 21 July 2019

धोनी हा या मालिकेतील संघनिवडीसाठी अनुपलब्ध आहे. त्याने आपली अनुपलब्धता कळवली आहे, आता त्याचवेळी आम्ही पुढील विश्वकरंडक स्पर्धेसाठीचा विचार करुनच संघनिवड करीत आहोत. आता विश्वकरंडक स्पर्धा संपल्यावर आम्हीही योजना तयार केली आहे. त्यानुसारच रिषभ पंतला जास्तीत जास्त संधी देण्याचे ठरवले आहे. त्याला आम्ही घडवणार आहोत. ही आमची योजना आहे, त्याबाबत जास्त काहीही मी बोलणार नाही असे प्रसाद यांनी सांगितले. 

मुंबई : महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेटचा निरोप घेतला नसला, निवृत्ती जाहीर केली नसली तरी भारतीय क्रिकेट मंडळाच्या निवड समितीने त्याला निरोप दिला असल्याचे स्पष्ट संकेत निवड समितीचे अध्यक्ष एम एस के प्रसाद यांनी दिले. आम्ही आमचा भविष्याचा मार्ग तयार केला आहे असे सांगताना आमचे लक्ष तीन यष्टीरक्षकांवर आहे असे सांगताना थेट धोनीचे नाव घेणेही टाळले.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीस धोनीच्या निवृत्तीबाबत प्रश्न आल्यावर संघनिवडीबाबतचा विषय झाल्यावरच त्याचे उत्तर देईन असे सांगितले. मात्र त्याचवेळी पत्रकार परिषदेत याबाबतचे प्रश्न सातत्याने फिरवून आले. त्यावेळी उत्तर देताना निवृत्तीचा निर्णय हा धोनीचा असेल, पण त्याच्या संघातील निवडीचा निर्णय आमचा असेल, असे स्पष्ट करीत धोनीची भविष्यात संघात निवड होण्याची शक्यता धूसरच असल्याचे सूचित केले. 

धोनी हा या मालिकेतील संघनिवडीसाठी अनुपलब्ध आहे. त्याने आपली अनुपलब्धता कळवली आहे, आता त्याचवेळी आम्ही पुढील विश्वकरंडक स्पर्धेसाठीचा विचार करुनच संघनिवड करीत आहोत. आता विश्वकरंडक स्पर्धा संपल्यावर आम्हीही योजना तयार केली आहे. त्यानुसारच रिषभ पंतला जास्तीत जास्त संधी देण्याचे ठरवले आहे. त्याला आम्ही घडवणार आहोत. ही आमची योजना आहे, त्याबाबत जास्त काहीही मी बोलणार नाही असे प्रसाद यांनी सांगितले. 

विंडिज दौऱ्यासाठी आम्ही रिषभ पंत, वृद्धीमान साहाची निवड केली आहे. के एस भारतचा विचार केला आहे. भविष्यात यष्टीरक्षकांची निवड करताना आम्ही या तिघातूनच निवड करणार आहोत, असे प्रसाद यांनी यष्टीरक्षकांबाबत सांगताना धोनीचा उल्लेख टाळला आहे. त्याचबरोबर त्यांनी आम्ही आमची भविष्याची योजनेची धोनीसह चर्चा केली आहे, असे सांगत जणू धोनीला नेमके काय घडणार आहे, असेही सूचीत केले. 

धोनीच्या निवृत्तीबाबत आपण काहीही बोलणार नाही, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर तो सध्या फिट नाही. तो फिट असेल, तो संघनिवडीसाठी उपलब्ध असेल, त्यावेळी त्याबाबत विचार करु असे सांगितल्यावर काही वेळातच प्रसाद यांनी धोनीबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, निवृत्तीचा निर्णय हा पूर्णपणे वैयक्तिक असतो. धोनीसारख्या दिग्गज खेळाडू निवृत्त कधी व्हावे हे पूर्णपणे माहीती असते. अर्थात भविष्यात संघ कसा असेल, त्याचे स्वरुप कसे असेल, निवडीची दिशा काय असेल, त्याचा निर्णय निवड समितीचा असतो, असे सांगत धोनीला आम्ही निरोप दिला आहे, असे भारताचे माजी यष्टीरक्षक प्रसाद यांनी सांगितले.

​ ​

संबंधित बातम्या