लिव्हरपूलची विजयी मालिका "वार'कडून खंडित

वृत्तसंस्था
Monday, 21 October 2019

-  लिव्हरपूलची प्रीमियर लीग फुटबॉलमधील मालिका अखेर "वार'ने खंडित केली.

-  लिव्हरपूलला मॅंचेस्टर युनायटेडविरुद्ध 1-1 बरोबरी मान्य करावी लागली. 

लंडन - लिव्हरपूलची प्रीमियर लीग फुटबॉलमधील मालिका अखेर "वार'ने खंडित केली. व्हिडिओ असिस्टंट रेफरीने लिव्हरपूलविरुद्धच्या गोलसाठी रचलेली चाल अवैध असल्याचा निर्णय दिला नाही आणि लिव्हरपूलला मॅंचेस्टर युनायटेडविरुद्ध 1-1 बरोबरी मान्य करावी लागली. 
युनायटेडचा बचावपटू व्हिक्‍टर लिंडेलोफ याने लिव्हरपूलचा आक्रमक दिवॉक ओरिगी याला अवैधरीत्या रोखले होते; पण त्याकडे "वार'ने दुर्लक्ष केले. याचाच फायदा घेत मार्कस रॅशफोर्डने युनायटेडचा गोल केला. या वेळी "वार'ची मदत घेण्यात आली. त्या वेळी लिंडेलोफने ओरीगीला अवैधरीत्या रोखल्याचे स्पष्ट दिसले. मात्र, यास कोणताही आक्षेप न घेतल्याबद्दल लिव्हरपूलचे मार्गदर्शक जर्गन क्‍लॉप यांनी आक्षेप घेतला. 
युनायटेडच्या या गोलनंतर काही वेळातच लिव्हरपूलच्या सादिओ मेन याने केलेला गोल अवैध ठरवण्यात आला. त्या वेळी मेनच्या हाताला चेंडू लागल्याचे दिसले. मी ही रिप्ले नीट बघितली नाही; पण तो हॅंडबॉल असू शकतो. निर्णय चुकीचा असो की बरोबर, तो आमच्याविरुद्धच कसा, अशी विचारणाही क्‍लॉप यांनी केली. 

इंटर मिलान बचावले 
रोम ः अखेरच्या मिनिटात नशिबाची साथ लाभल्याने इंटर मिलानने सॅसुओलोचा 4-3 असा पाडाव केला. या विजयामुळे आघाडीवरील युव्हेंटिस आणि इंटर मिलान यांच्यात आता एका गुणाचाच फरक आहे. लेसीने एसी मिलानला 2-2 रोखल्याचाही एसी मिलानला फायदा झाला. वीस मिनिटे असताना इंटर मिलान 4-1 आघाडीवर होते; पण त्यानंतर त्यांना कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागले. 

मार्सेलीचा अखेर विजय 
पॅरिस ः मार्सेलीने लीग वनमधील विजयाचा दुष्काळ संपवताना स्ट्रॉसबर्गला 2-0 असे पराजित केले. मार्सेलीने चार सामन्यांनंतर विजय मिळवला; पण अजूनही आघाडीवरील पीएसजीने मार्सेलीला आठ गुणांनी मागे टाकले आहे. यामुळे दोन संघांत पुढील आठवड्यात होणाऱ्या लढतीत पारंपरिक संघर्ष नसेल असे मानले जात आहे. पीएसजीने नाईसचा 4-1 पाडाव केला. 

शेल्केने संधी दवडली 
बर्लिन ः शेल्केला बंडेस्लीगा अर्थात जर्मनी लीगमध्ये हॉफेनहेमविरुद्ध 0-2 हार पत्करावी लागली. ही लढत गमावल्याने शेल्केचे अव्वल स्थान मिळवण्याची संधी हुकली. दोन प्रमुख मध्यरक्षकांच्या दुखापतीचा शेल्केला फटका बसला. कोलोग्नेने पॅडेरबॉर्नला 3-0 हरवत स्पर्धेतील गच्छंतीचा धोका टाळला आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या