अखेर मेस्सीचा मोसमातील पहिला गोल

वृत्तसंस्था
Monday, 7 October 2019

-लिओनेल मेस्सीने अखेर ला लीगा मोसमातील पहिला गोल केला. बार्सिलोनास सूर गवसला आणि त्यांनी सेविलाचा 4-0 असा पराभव करून ला लीगा गुणतक्‍त्यात दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली

- युव्हेंटिसने इंटर मिलानला 2-1 असे हरवून सिरी ए लीगमध्ये अव्वल क्रमांक मिळवला

- मॅंचेस्टर युनायटेडची बाराव्या क्रमांकावर घसरण, सिटीही पराजित 

माद्रिद -  लिओनेल मेस्सीने अखेर ला लीगा मोसमातील पहिला गोल केला. बार्सिलोनास सूर गवसला आणि त्यांनी सेविलाचा 4-0 असा पराभव करून ला लीगा गुणतक्‍त्यात दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली. 
लुईस सुआरेझ, आर्तुरो व्हिडाल आणि औसमेन देम्बेले यांनी आठ मिनिटांत गोल करीत बार्सिलोनास 3-0 असे आघाडीवर नेले. त्यानंतरच मेस्सीने मोसमातील गोलदुष्काळ संपवला. अर्थात या सामन्यात धसमुसळा खेळ झाला होता. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंवर कारवाई झाली, त्यामुळे लढत संपली, त्या वेळी बार्सिलोनाचे नऊच खेळाडू मैदानात होते. दरम्यान, बार्सिलोनाच्या दुसऱ्या गोलच्या वेळी त्यांच्या संघातील सर्व अकरा खेळाडूंचा चेंडूला स्पर्श झाला होता. 
सलग चौथ्या विजयामुळे बार्सिलोना आणि रेयाल माद्रिदमध्ये दोन गुणांचाच फरक आहे. 

युव्हेंटिस अव्वल स्थानी 
मिलान ः युव्हेंटिसने इंटर मिलानला 2-1 असे हरवून सिरी ए लीगमध्ये अव्वल क्रमांक मिळवला. मिलानची ही पहिलीच हार. बदली खेळाडू गोंझालो हिगुएन याने 80 व्या मिनिटास निर्णायक गोल केला. नापोलीला तोरिनोविरुद्ध गोलशून्य बरोबरी पत्करावी लागली. 

लिऑनची अनपेक्षित हार 
पॅरीस ः लिऑनला लीग वनमध्ये सेंट एटीनेविरुद्ध 0-1 अशी हार पत्करावी लागली. सामन्यापूर्वी काही तास एटीने संघाने नवे मार्गदर्शक क्‍लॉड प्यूएल यांच्याकडे सूत्रे सोपवली होती. लिऑनची या मोसमातील कामगिरी पाहता त्यांची हार अनपेक्षित नव्हती. ते आता अकराव्या क्रमांकावर आहेत. 

मॅंचेस्टर युनायटेडची बाराव्या क्रमांकावर घसरण, सिटीही पराजित 
लंडन ः न्यू कॅसलचा नवोदित खेळाडू मॅथ्यू लॉंगस्टाफ याने मॅंचेस्टर युनायटेडच्या जखमेवर मीठ चोळले. मॅथ्यूच्या गोलमुळे न्यू कॅसलने मॅंचेस्टर युनायटेडचा 1-0 असा पाडाव केला. दरम्यान, मॅंचेस्टर सिटी वोव्हज्‌विरुद्ध 0-2 पराजित झाले. त्यामुळे ते लिव्हरपूलला मागे टाकण्याची शक्‍यता जणू दुरावलीच आहे. या पराभवामुळे युनायटेडची बाराव्या क्रमांकावर घसरण झाली. यामुळे त्यांच्यावर आता प्रीमियर लीगमधून गच्छंतीची टांगती तलवार आहे. युनायटेडने प्रीमियर लीगमधील सलग तीन लढती गमावल्या आहेत. गेल्या पाचपैकी एकमेव विजय पेनल्टी शूटआउटवर आहे. त्यांनी मार्चनंतर एकही अवे लढत जिंकलेली नाही. यंदाच्या स्पर्धेतील आठ सामन्यांत नऊ गुण ही त्यांची तीन दशकातील सर्वात खराब कामगिरी आहे. विजयानंतरही न्यू कॅसल तेरावे आहेत. दरम्यान, पराभवामुळे सिटी आणि अव्वल लिव्हरपूल यांच्यातील फरक आठ गुणांचा झाला आहे. सिटीने प्रथमच एतिहाद स्टेडियमवर गोल स्वीकारला. दोन दिवसांत मैदानावर उतरलेल्या वोव्हज्‌च्या सरस खेळाने सिटीला त्रस्त केले. 


​ ​

संबंधित बातम्या