राष्ट्रीय किशोर खो-खो - महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची आगेकूच

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 October 2019

-  महाराष्ट्राच्या मुले आणि मुलींच्या संघांनी किशोर गटाच्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विजय मिळवून आपल्या मोहिमेस सुरवात केली.

- मुलींच्या गटात महाराष्ट्राने मध्य भारत संघाचा 11-2 असा एक डाव 9 गुणांनी पराभव केला.

- मुलांच्या गटातील सामन्यात महाराष्ट्राने उत्तराखंडचा 12-4 असा एक डाव 8 गुणाने धुव्वा उडविला.

पुणे - महाराष्ट्राच्या मुले आणि मुलींच्या संघांनी किशोर गटाच्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विजय मिळवून आपल्या मोहिमेस सुरवात केली. ही स्पर्धा रांची येथील अल्बर्ट एक्का खो-खो मैदानावर सुरू आहे. 
मुलींच्या गटात महाराष्ट्राने मध्य भारत संघाचा 11-2 असा एक डाव 9 गुणांनी पराभव केला. महाराष्ट्राकडून दीपाली राठोड हिचा अष्टपैलू खेळ निर्णायक ठरला. तिने 1.30 मिनिटे बचाव केल्यावर आक्रमणात चार गडी बाद केले. संध्या सुरवसे हिचा बचाव विशेष ठरला. तिने तब्बल 4.50 मिनिटे मध्य भारतच्या आक्रमकांना हुलकावण्या दिल्या. मध्य भारत संघाकडून एम. सक्‍सेना हिचाच खेळ उल्लेखनीय झाला. 
मुलांच्या गटातील सामन्यात महाराष्ट्राने उत्तराखंडचा 12-4 असा एक डाव 8 गुणाने धुव्वा उडविला. रोशन कोळीचा अष्टपैलू खेळ निर्णायक ठरला. त्याने 2.40 मिनिटे बचाव करताना आपल्या धारदार आक्रमणाने 5 गडी टिपले. नागेश वसावे याचीही अष्टपैलू चमक महत्त्वाची ठरली. त्याने 1.40 मिनिटे बचाव केल्यावर 4 गडी बाद केले. 
अन्य निकाल ः मुले ः गुजरात 28 वि.वि. पुड्डुचेरी 15 (तेरा गुणांनी) 
मुली ः ओडिशा 16 वि.वि. आंध्र प्रदेश 4 (12 गुणांनी), तमिळनाडू 15 वि.वि. दिल्ली 13 (दोन गुणांनी). 


​ ​

संबंधित बातम्या