जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई पदकापासून वंचित
-पाठीच्या दुखापतीतून पुनरागमन करणारी मीराबाई चानू जागितक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदकापासून वंचित
-मीराबाईने स्नॅचमध्ये 87 किलो, तसेच क्लीन अँड जर्कमध्ये 114 किलो असे एकूण 201 किलो वजन पेलले
-या कामगिरीसह तिने राष्ट्रीय विक्रम नाेंदविला. मात्र, पदक मिळविण्यात अपयश
मुंबई - मीराबाई चानूने जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या 49 किलो गटात दोनशे किलो वजन उचलण्याचे लक्ष्य गाठले, पण त्यानंतरही तिला पदकापासून वंचित रहावे लागले. क्लीन अँड जर्कच्या अखेरच्या प्रयत्नात मीराबाई 118 किलो वजन पेलू शकली नाही आणि तिचे पदक हुकले.
मीराबाईने स्नॅचमध्ये 87 किलो, तसेच क्लीन अँड जर्कमध्ये 114 किलो असे एकूण 201 किलो वजन पेलले. ही तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे, तसेच राष्ट्रीय विक्रमही तिने मोडीत काढला. तिला स्नॅचमध्ये अखेरच्या प्रयत्नात 89 किलो वजन उचलता आले नाही, त्यामुळे ती या टप्प्यानंतर पाचवी होती. तोच प्रयत्न साधला असता तर ती तिसरी आली असती. आता क्लीन अँड जर्कमध्ये तिला शरीराचे वजन तिसऱ्या क्रमांकावरील स्पर्धकापेक्षा जास्त असल्यामुळे एकंदरीतच आघाडी हवी होती, पण 118 किलोचा प्रयत्न विफल ठरल्याने पदकापासून वंचित रहावे लागले.