शमी : प्रयत्नांत नाही कमी हीच हमी अन् हॅट्ट्रिकची रमी

मुकुंद पोतदार
Sunday, 23 June 2019

भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमी यो-यो टेस्टमध्ये नापास. अफगाणिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्यास मुकावे लागले.

भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमी यो-यो टेस्टमध्ये नापास. अफगाणिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्यास मुकावे लागले.

जून 2019 :
शमीची वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध अखेरच्या षटकात हॅट्ट्रिक. अटीतटीच्या सामन्यात भारताच्या विजयात निर्णायक योगदान

गतवर्षी वर्ल्ड कपचे काउंटडाऊन सुरु झाले होते. त्यावेळी शमी याच्याऐवजी नवदीत सैनी याची निवड झाली होती, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी अंतिम संघात (प्लेइंग इलेव्हन) मात्र सैनीला संधी मिळाली नव्हती. ती कसोटी बंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर झाली होती. तेथेच असलेल्या नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीत शमीने फिटनेसवर मेहनत घेतली. त्यानंतर त्याने यो-यो टेस्टमधील 35 मार्कांचा निकष असलेला 16.1 मार्कांचा टप्पा साध्य केला.

त्यावेळी शमीसह संजू सॅमसन आणि अंबाती रायुडू असे तिघे यो-यो टेस्टमध्ये नापास झाले होते. सॅमसनला भारत अ संघातून बाहेर व्हावे लागले. रायुडूला वन-डे संघातून डच्चू मिळाला. शमीसमोर इशांत शर्मा,  उमेश यादव अशा सिनीयर्ससह भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा यांचेही आव्हान होते.

तेव्हा यो-यो टेस्टवरून काही माजी खेळाडू प्रतिकूल ताशेरे मारत होते. संघात निवडीचा हाच एक निकष असला पाहिजे का, कौशल्य-अनुभव-रेकॉर्डचे काय असा मतप्रवाह निर्माण होत होता. अशावेळी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी परखड भूमिका घेतली.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटने तर स्पष्ट केले होते की, या एकूणच विषयाकडे भावनेच्या भरात पाहिले जाऊ नये. वैयक्तिकच नव्हे तर संघासाठी व्यापक हित साधणारा मुद्दा असा दृष्टिकोन असावा. असे काही कठोर निर्णय घेतले जातात तेव्हा संघहितच डोळ्यासमोर असते.

विराट हा स्वतः अफाट फिटनेसद्वारे कर्णधार म्हणून आदर्श निर्माण करतो. शास्त्रीबुवांनी तर त्यांच्या खास शैलीत ठणकावून सांगितले होते. तुमच्याकडे विशिष्ट क्षमता असेल आणि तुम्ही तंदुरुस्त असाल तर ती वृद्घिंगत करू शकता. त्यामुळेच आम्ही यो-यो टेस्टवर भर दिला आहे. जर कुणाला ही तात्पुरती अपवादात्मक बाब वाटत असेल तर वाईट असे की त्याचा हा समज चुकीचा आहे. तो संघाबाहेर चालता होऊ शकतो.

वास्तविक यो-यो टेस्टमध्ये दांडी उडण्याआधी शमीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत पाच विकेटची कामगिरी केली होती. जोहान्सबर्गमधील वाँडरर्स स्टेडियमवरील विजयात त्याने मोलाचे योगदान दिले होते. 241 धावांच्या आव्हानासमोर आफ्रिकेचा डाव 177 धावांत आटोपला होता. तेव्हा शमीने 28 धावांत निम्मा संघ गारद केला होता. त्या कसोटीत भुवनेश्वर कुमार सामनावीर ठरला होता. भुवीने अनुक्रमे 3-1 विकेट, 30-33 धावा अशी कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला झुकते माप मिळणे स्वाभाविक होते.

दरम्यान, शमीच्या कौटुंबिक पातळीवर खळबळ माजली होती. पत्नी त्याच्यावर विवाहबाह्य संबंधांचा आणि मॅच-फिक्सींगचाही आरोप करीत होती. त्यामुळे शमीला बीसीसीआयच्या काँट्रॅक्टमध्ये स्थान मिळत नव्हते. चौकशीअंती त्याचा खेळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. यातच केवळ फिटनेसअभावी संघातील स्थान गमवावे लागणे शमीसाठी धक्कादायक ठरले होते.

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांचे दौरे आणि मग वर्ल्ड कप असा भरगच्च मोसम असताना शमीसमोर कमालीचे आव्हान होते. अशावेळी त्याने प्रथम प्रयत्नपूर्वक मेहनत घेऊन यो-यो टेस्टचा अडथळा पार केला. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याने पुनरागमन केले. तेथे 5 कसोटींत 16, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 4 कसोटींत 16 अशा कामगिरीसह त्याने संघातील स्थान पक्के केले.

आयपीएलमध्ये शमीने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून 14 सामन्यांत 19 विकेट घेतल्या. ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेलला त्याने यॉर्करवर गारद केले होते, पण तेव्हा 30 यार्ड सर्कलमध्ये एक फिल्डर कमी असल्याचे स्पष्ट झाल्याने पंचांनी नोबॉल दिला. मग रसेलने शमीवर आक्रमण केले होते. शमीच्या अखेरच्या व डावातील 19व्या षटकात त्याने 25 धावा फटकावल्या होत्या. त्याने सलग तीन षटकार खेचले होते. 

अर्थात, तेव्हा रसेलच्या तडाख्यातून कुणीच सुटले नव्हते. शमी हा अस्सल वेगवान गोलंदाज आहे. तो विकेट घेणारा गोलंदाज आहे. आयपीएलमधील कामगिरीद्वारे त्याने झटपट क्रिकेटमध्येही आपली क्षमता दाखवून दिली. अशा शमीची वर्ल्ड कपसाठी निवड झाली, पण अंतिम संघात त्याला स्थान मिळत नव्हते. तेव्हा फलंदाजीतही कौशल्य असल्यामुळे भुवीची निवड होत होती. भुवीच्या मांडीचा स्नायू दुखावला. त्यामुळे शमीची प्रतिक्षा संपली.

शमीने अफगाणिस्तानविरुद्ध अखेरच्या षटकात पहिल्याच चेंडूवर महंमद नबी याने चौकार ठोकल्यानंतरही शमीने विजय निसटू दिला नाही. त्याने मग डॉट बॉल टाकून दडपण आणले. तिसऱ्या चेंडूवर नबीचा सीमारेषेवर झेल गेला. मग शमीने अफताब आलम आणि मुजीब उर रेहमान यांची दांडी उडविली.
शमीने हॅट््ट्रीकचा जल्लोष केला तो सुद्धा बोलका होता. त्याने मुठी आवळल्या. वर्षभरात ज्या घडामोडींना सामोरे जावे लागले त्याचे फळ त्याला मिळल्यामुळे त्याला आंतरिक समाधान लाभल्याचे जाणवत होते.

अशा या शमीला या चारोळींसह सलाम करूयात 
प्रयत्नांत कदापी नाही कमी
याचीच सदैव देत राहतो हमी
असा हा आपला महंमद शमी
ज्याने जुळविली हॅट्ट्ट्रीकची रमी


​ ​

संबंधित बातम्या