मोहसीनने सोडले 'पीसीबी'चे अध्यक्षपद

वृत्तसंस्था
Thursday, 20 June 2019

आपल्याला पदमुक्त करावे, अशी विनंती मोहसीन यांनीच पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांना केली होती. त्यांच्या विनंतीचा आदर करून त्याला मुक्त करण्यात आल्याचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले.

कराची : पाकिस्तानचा माजी कसोटी क्रिकेटपटू मोहसीन खान यांनी पाकिस्तान क्रिकेट मंडळातील क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 

आपल्याला पदमुक्त करावे, अशी विनंती मोहसीन यांनीच पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांना केली होती. त्यांच्या विनंतीचा आदर करून त्याला मुक्त करण्यात आल्याचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले. त्याची जागा आता वसिम खान घेणार आहेत. ते सध्या पाक क्रिकेट मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

पाकिस्तान संघाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील अपयशाचे पोस्ट मार्टेम करण्याची जबाबदारी या क्रिकेट समितीवर होती. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने संचालकाच्या बैठकीत व्यवस्थापकीय संचालकाला अधिक अधिकार देण्याचा निर्णय घेतला. मोहसीन यांच्या राजीनाम्यामागे हेच कारण असू शकते, असा एक मतप्रवाह सध्या पाकिस्तानात चर्चेत आहे. मात्र, विश्‍करडंक स्पर्धेनंतर मोहसीन यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली जाण्याची शक्‍यता असल्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला, असे पाक क्रिकेट मंडळाच्या सूत्राने सांगितले.

मोहसीनसह वसिम आणि मिस्बा हे विविध वाहिन्यांवर विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी समालोचक म्हणून काम करत आहेत. तिघांनी पाकिस्तानी संघाच्या कामगिरीवर टीकाच केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा बाहेर येणार असेच चित्र निर्माण झाले आहे. 

आमूलाग्र बदल होणार 
विश्‍वकरंडकातील पाक संघाच्या कामगिरीचे पोस्टमार्टेम होणार आणि कर्णधारपदापासून खेळाडू ते अगदी संघ व्यवस्थापन तसेच निवड समितीपर्यंत संघात आमूलाग्र बदल केले जातील. पण, त्यासाठी विश्‍वकरंडक संपण्याची वाट पाहावी लागेल.


​ ​

संबंधित बातम्या