शेर्पा बनले जीवनाचा अविभाज्य घटक

डॉ. सुमित मांदळे
Sunday, 8 December 2019

गिरीप्रेमी संस्थेतर्फे येत्या 13 तारखेला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीरात 20 शेर्पांना  आमंत्रित करण्यात आले आहे. कांचनजुंगा मोहीमेवरील फिल्मचे लाँचिंग त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यानिमित्त अष्टहजारी मोहिमांमधील सहभागी गिर्यारोहक आणि शेर्पा यांच्यातील ऋणानुबंध उलगडणारी मालिका.

सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर नाचत-बागडात वावरणाऱ्या आम्हा गिर्यारोहकांना वेध असतात ते एट थाऊजंडरचे. एव्हरेस्टच नव्हे तर कोणतेही एट थाऊजंडर सर करायचे असे आमचे स्वप्न असते.

गिरीप्रेमी संस्थेतर्फे येत्या 13 तारखेला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीरात 20 शेर्पांना  आमंत्रित करण्यात आले आहे. कांचनजुंगा मोहीमेवरील फिल्मचे लाँचिंग त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यानिमित्त अष्टहजारी मोहिमांमधील सहभागी गिर्यारोहक आणि शेर्पा यांच्यातील ऋणानुबंध उलगडणारी मालिका.

सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर नाचत-बागडात वावरणाऱ्या आम्हा गिर्यारोहकांना वेध असतात ते एट थाऊजंडरचे. एव्हरेस्टच नव्हे तर कोणतेही एट थाऊजंडर सर करायचे असे आमचे स्वप्न असते.

2016 मध्ये गिरीप्रेमीच्या एट थाऊजंडर मोहिमेत माझी निवड झाली. माझ्यासाठी ही एक सुवर्णसंधी होती. गिरीप्रेमीची ती चौथी अष्टहजारी मोहीम होती. 2012 मध्ये एव्हरेस्टची भव्य नागरी मोहीम यशस्वी करीत गिरीप्रेमीने जागर केला. तेव्हाच एक संस्था म्हणून सर्व 14 अष्टहजारी शिखरे सर करण्याचा संकल्प सोडण्यात आला.
त्या मोहिमेत मी आणि गणेश मोरेची निवड झाली होती. कारकिर्दीत प्रथमच अष्टहजारी मोहीम असल्यामुळे माझ्या मनात उत्सुकता, दडपण असे संमिश्र भाव होते. 13 मे 2016 रोजी रात्री दोन वाजता माझे काऊंटडाऊन सुरु झाले. कामी लामा शेर्पाच्या साथीत मी समिट अटेम्प्ट सुरु केला. मी प्रथमच इतक्या हाईटवर जाणार होतो. ऑक्सीजन सिलींडरचा म्हणजे अगदी नेमकेपणाने सांगायचे तर ऑक्सीजन मास्क लावण्याचा अनुभव मला नव्हता. कामी लामा माझ्या मागोमाग चालत होता. पाऊण-एक तासानंतर तो ऑक्सीजन प्रेशर, मास्क चेक करायचा. ऑक्सीजन फ्लो सुरु आहे की नाही याची पण खात्री करायचा. माझ्या डोक्यात तेव्हा फक्त आणि फक्त समिटचा विचार सुरु होता. त्यामुळे ऑक्सीजन सिलींडरविषयीच्या या बाबींचे म्हणजे पॅरामीटर्सला किती महत्त्व आहे हे माझ्या गावीही नव्हते.

चो यू मोहिमेच्या वेळी जवळपास 40 टक्के रुट फिक्स झाला नव्हता. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी फ्री क्लायंबिंग करावे लागले. त्यावेळी कामी लामाची साथ निर्णायक ठरली. त्याने पूर्वी चो यूचे समिट केले होते. त्यामुळे रुट त्याला जणू काही तोंडपाठ होता असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरू नये. आम्ही रॉक क्लायंबिंग करतो तेव्हा फॉल झाला तर स्पॉटर असतो. तो तुम्हाला रोखू शकतो. एट थाऊजंडरमध्ये म्हणजे त्या हाईटला सर्वच समीकरणे वेगळी असतात. कामी लामा रुट माहिती असल्यामुळे पुढे जाऊ शकला असता, पण त्याने मागे चालणे पसंत केले, किंबहुना त्यास प्राधान्य दिले. याचे कारण माझा फॉल झाला तर तो त्याच्या अंगावर होईल आणि तो मला रोखू शकेल. अर्थात तशी वेळ आली नाही. 

अशाप्रकारे आम्ही समिटवर गेलो. 14 मे 2016 रोजी सकाळी अकरा वाजता मी गिरीप्रेमीची मोहीम फत्ते केली. कामी लामाने माझे अभिनंदन केले. तो म्हणाला की, काँग्रॅच्युलेशन्स, आपने अॅडव्हर्स कंडीशन्स में बहुत अच्छा क्लायंबिंग किया. 

परत येताना माझ्या थर्मासचे झाकण फ्रॉस्टींगमुले ब्लॉक जाले होते. त्यावेळी कामी लामाने मला त्याच्याकडचे पाणी प्यायला दिले. नंतर मी जेव्हा बेस कॅम्पवर परतलो तेव्हा मला कामी लामाचा सपोर्ट, त्याची साथ किती मोलाची ठरली याची नव्याने जाणीव झाली. बेस कॅम्पचा निरोप घेण्यापूर्वी मी त्याचे मनोमन आभार मानले. त्याने मला आगामी मोहिमांसाठी शुभेच्छा दिल्या.

हा झाला पहिला अनुभव. आता कांचनजुंगा मोहीम, जी यंदा पार पडली, त्यातील शेर्पांविषयी तर खुप काही सांगण्यासारके आहे. तेव्हा माझा मिंगमा, तर आनंद माळीचा फुर्बा दोर्जी हा शेर्पा होता. त्यांना रुट ओपनिंगला जावे लागले. इथे महत्त्वाचा मुद्दा असा की शेर्पा हे समिट बोनससाठीच काम करतात असे म्हटले जाते, पण ते खरे नाही. अन्यथा आमच्या दोघांच्या शेर्पांनी रुट ओपनिंगला नकार दिला असता, पण शेर्पा हे स्वतः मुळात गिर्यारोहक असतात. त्यामुळे त्यांनी संघभावनेला प्राधान्य दिले.
मग समिट अटेम्प्टच्यावेळी मिंगमा आला नाही, पण फुर्बा दोर्जी आला. याचे कारण त्याला इतर तीन भावांबरोबर रेकॉर्ड करायचे होते.

आता माझ्याकडील ऑक्सीजन सिलींडर्सचा भार दुसऱ्या एखाद्या शेर्पावर पडणार होता. त्यासाठी किरण साळस्तेकर याचा शेर्पा तेनसिंग याने पुढाकार घेतला. त्याने किरणचे तीन आणि माझे तीन असे एकूण सहा ऑक्सीजन सिलेंडर्स घेतले. हा सुमारे 40 किलोचा भार त्याने पेलला. तेनसिंग आहेच तगडा शेर्पा. त्याला आम्ही राजधानी एक्सप्रेस असे बिरूद बहाल केले होते.

आमचे लि़डर उमेश झिरपे यांना असंख्य शेर्पा ओळखतात. त्यांच्या खालोखाल मला डिमांड आहे, असे मी म्हणेन. मला गर्वाची बाधा झाली  म्हणून नव्हे तर एक डॉक्टर असल्यामुळे माझी तशी प्रतिमा आहे. कांचनजुंगा मोहीमेत आम्ही 18 हजार फुटांवरील बेस कॅम्पवर दवाखाना सुरु केला होता आणि तो सुद्धा मोफत. तेथे ज्येष्ठमधाच्या काड्या प्रचंड फेमस झाल्या.

डॉक्टर असल्याने शेर्पा माझ्याकडे व्यक्त व्हायचे. त्यांचे सुख-दुःख शेअर करायचे. त्यामुळेच माझी शेर्पांशी छान दोस्ती झाली आहे. मी आता त्यांची भाषा, म्हणजे तिबेटीही शिकतो आहे. गरम पाण्याला छू म्हणतात. ते सारखे लागते. त्यामुळे छू म्हटले की गरम पाणी हजर. गुड नाईटला जिम नो जिम्नो असे म्हणतात. काय कसा आहेस याला ताशी तले अशी माझी आतापर्यंतची प्रगती आहे.

अलिकडची आठवण ऑक्टोबरमधली आहे. त्यावेली दावा फिंजोक याने ज्येष्टमधाच्या काड्या मागून घेतल्या. त्याची पत्नी गायिका आहे. तिच्यासाठी म्हणजे तिच्या गळ्यासाठी तिला काड्या पाहिजे होत्या.

तर अशाप्रकारे शेर्पा हे गिर्यारोहक म्हणून माझ्या कारकिर्दीचा नव्हे तर एकूणच जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत.

(शब्दांकन ः मुकुंद पोतदार)


​ ​

संबंधित बातम्या