अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत एमपी संघाचे एकतर्फी वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 October 2019

- मध्य प्रदेश हॉकी ऍकॅडमी संघाने आपले निर्विवाद वर्चस्व राखून येथे संपन्न झालेल्या 16 वर्षांखालील एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविले

- अंतिम सामन्यात त्यांनी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, अमृतसर संघाचा 8-2 असा पराभव केला. 

- मध्य प्रदेश हॉकी संघाचे हे तिसरे विजेतेपद ठरले. त्यांनी यापूर्वी 2016 आणि 2017 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. गेल्या वर्षी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. 

पुणे - मध्य प्रदेश हॉकी ऍकॅडमी संघाने आपले निर्विवाद वर्चस्व राखून येथे संपन्न झालेल्या 16 वर्षांखालील एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. म्हाळुंगे बालेवाडी येथे झालेल्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्यांनी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, अमृतसर संघाचा 8-2 असा पराभव केला. 
मध्य प्रदेश हॉकी संघाचे हे तिसरे विजेतेपद ठरले. त्यांनी यापूर्वी 2016 आणि 2017 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. गेल्या वर्षी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. 
अंतिम सामन्याची सुरवात खरे तर सनसनाटी झाली होती. सामन्याच्या आठव्याच मिनिटाला अमृतपाल सिंगने एसजीपीसी संघाला आघाडीवर नेले होते. सामन्यातील ही स्थिती पाहता संपूर्ण स्पर्धेत एमपी संघ प्रथमच पिछाडीवर राहिला होता.
 अर्थात, सुरवातीच्या गोलने एमपी संघाचे खेळाडू प्रेरित झाले आणि त्यांनी झपाटून खेळ करत विश्रांतीला संघाला विजय निश्‍चित करणारी 6-1 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला प्रियोबात्रा तेलेम याने एमपी संघाला बरोबरी साधून दिली आणि त्यानंतर मैदानावर त्यांचेच राज्य होते. त्यानंतर अली अहमद, महंमद झैद खान यांनी प्रत्येकी दोन आणि शैलेंद्र सिंगने एक गोल करून संघाची बाजू भक्कम केली. 
सामन्याच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा एसजीपीसीने सुरवातीचा गोल केला. सामन्याच्या 49व्या मिनिटाला अमृतपालनेच एक गोल करून पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर एमपी संघाच्या खेळाडूंनी सामन्यावरील आपली पकड निसटू दिली नाही. प्रतिस्पर्ध्यांना वरचढ होण्याची संध न देता त्यांनी संधी मिळताच आपले गोलाधिक्‍य वाढविण्याचे काम अचूक केले. दोन मिनिटात दोन गोल करून त्यांनी आघाडी वाढवत सामन्याचा निकाल निश्‍चित केला. यात 50व्या मिनिटाला इंगालेम्बा थौनाजाम, तर 52व्या मिनिटाला हैदर अली याने गोल केला. 
विजेतेपदासाठी एमपी संघाला रोख 50 हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात आले. एसजीपीसी संघ रोख 30 हजार रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला. 
त्यापूर्वी झालेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात सेल संघाने शूट आऊटमध्ये जय भारत हॉकी भिवानी संघाचा 4-2 असा पराभव केला. 
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्याची सुरवात वेगवान होती. सेल संघाने अकराव्या मिनिटाला अमोल एक्काने केलेल्या गोलच्या जोरावर खाते उघडले. मात्र, 26व्या मिनिटाला शिवम राणा याने जय भारत संघाला बरोबरी साधून दिली. मध्यंतराला 1-1 ही बरोबरी कायम होती. उत्तरार्धात हरियाना संघाने आघाडी घेतली. सामन्याच्या 31व्या मिनिटाला वासु देव याने गोल करून जय भारतचे पाऊल पुढे नेले. त्यानंतर त्यांनी आपला बचाव भक्कम ठेवताना अखेरच्या दोन मिनिटांपर्यंत आघाडी कायम राखली होती. मात्र, 59व्या मिनिटाला प्रशांतने गोल करून सेल संघाला बरोबरी साधून दिली. नियोजित वेळेच्या या 2-2 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूट आऊट मध्ये सेलसाठी विष्णू यादव, राजकुमार मिंझ, केरोबिन लाक्रा, तरुण यादव यांनी गोल केले. जय भारतकडून केवळ अग्यापाल आणि शुभम यांनाच गोल करता आले. 
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नेहरू हॉकीचे सचिव आणि आशियाई पंच समितीचे भारतीय कार्याध्यक्ष कुकु वालिया यांच्या हस्ते आणि संयोजन समितीच्या कार्याध्यक्षा आणि एसएनबीपी समूहाच्या अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले, एसएनबीपी समूहाचे अध्यक्ष डॉ. डी. के. भोसले, एसएनबी समूहाच्या संचालिका देवयानी भोसले, संयोजन सचिव विभाकर तेलोरे, स्पर्धा समन्वयक फिरोझ शेख यांच्या उपस्थितीत पार पडला. 
----------
निकाल - 
अंतिम सामना ः एमपी ऍकॅडमी 8 (प्रियोबात्रा तेलेम 10वे, अली अहमद 18, 36वे, शैलेंद्र सिंग 20वे, महंमद झैद खान 40, 45वे, इंगलेम्बा थौनाओजाम 50वे, हैदर अली 52वे मिनिट) वि.वि. एसजीपीसी, अमृतसर 2 (अमृतपाल सिंग 8वे, 49वे मिनिट) मंध्यतर 3-1
तिसऱ्या क्रमांकासाठी 

सेल हॉकी ऍकॅडमी 2, 4 (अनमोल एक्का 11वे, प्रशांत 59वे मिनिट, विष्णू यादव, राजकुमार मिंझ, केरोबिन लाक्रा, तरुण यादव) वि.वि. जय भारत हॉकी भिवानी, हरियाना 2,2 (शिवम राणा, 25वे, वासु देव 31वे मिनिट, अग्यापाल, शुभम) मध्यंतर 1-1
------------- 
वैयक्तिक पारितोषिके 

सर्वोत्कृष्ट गोलरक्षक - येंगहॉन सॅनसन सिंग (सेल)
सर्वोत्कृष्ट बचावपटू - सरबजेंद्र सिंग (एसजीपीसी)
सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक - रवी दुर्गा (एसएनबीपी ऍकॅडमी)
सर्वोत्कृष्ट आक्रमक - अली मोहमंद (एमपी हॉकी ऍकॅडमी)
स्पर्धेचा मानकरी - श्रेयस धुपे (एमपी हॉकी ऍकॅडमी) 
 


​ ​

संबंधित बातम्या