अखिल भारतीय हॉकी - एमपी, एसजीपीसी अंतिम लढत
- मध्य प्रदेश हॉकी ऍकॅडमी संघाने निर्विवाद वर्चस्व राखताना येथे सुरू असलेल्या सोळा वर्षांखालील "एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी' स्पर्धेत सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली
- विजेतेपदासाठी त्यांची लढत शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी (एसजीपीसी), अमृतसर संघाशी पडणार आहे.
- उपांत्य फेरीच्या लढतीत एमपी संघाने सेल हॉकी ऍकॅडमीचा 4-2 असा पराभव केला. त्यानंतर एसजीपीसी संघाने हरियानाच्या जय भारत हॉकी भिवानी संघाचे आव्हान शूट आऊटमध्ये 3-1 असे मोडून काढले.
पुणे - मध्य प्रदेश हॉकी ऍकॅडमी संघाने निर्विवाद वर्चस्व राखताना येथे सुरू असलेल्या सोळा वर्षांखालील "एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी' स्पर्धेत सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली. या वेळी विजेतेपदासाठी त्यांची लढत शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी (एसजीपीसी), अमृतसर संघाशी पडणार आहे.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत एमपी संघाने सेल हॉकी ऍकॅडमीचा 4-2 असा पराभव केला. त्यानंतर एसजीपीसी संघाने हरियानाच्या जय भारत हॉकी भिवानी संघाचे आव्हान शूट आऊटमध्ये 3-1 असे मोडून काढले.
एमपी आणि सेल ऍकॅडमी यांच्यातील सामन्यात पूर्वार्धातील पहिल्या सत्रात वेगवान खेळ करताना वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. लागोपाठच्या मिनिटाला गोल करून एमपी संघाने आपले मनसुबे स्पष्ट केले. प्रथम सहाव्या मिनिटाला श्रेयस धुपे, तर लगोलग सातव्या मिनिटाला अली अहमद याने गोल करून संघाला पहिल्या सत्रातच 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामन्याच्या अकराव्या मिनिटाला प्रशांतने सेलचा एक गोल केला. मध्यंतराला एमपी संघाने 2-1 अशी आघाडी कायम राखली होती.
उत्तरार्धात महंमद दाड याने 35व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना एमपी संघाची आघाडी वाढवली. त्यानंतर सेल संघाने सामन्यात परतण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले. पण, एमपीचा बचाव त्यांना भेदता आला नाही. सामन्याच्या 37व्या मिनिटाला केरोबिन लाक्रा याने गोल करून संघाला पिछाडी भरून काढण्याचे समाधान दिले. प्रतिस्पर्धी संघ दडपणाखाली गेल्याचा फायदा उठवत एमपी संघाच्या इंगेलेम्हा थौनाओजाम याने 50व्या मिनिटाला गोल करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जबरदस्त खेळाचे प्रदर्शन पहायला मिळाले. एसजीपीसी संघाने जय बारत संघाने चांगलीच झुंज दिली. अचूक बचाव आणि गोल करण्याच्या गमाविलेल्या संधी यामुळे सामना नियोजित वेळेत गोलशृन्य बरोबरीत सुटला.
त्यानंतर "शूट-आऊट' मध्ये एसजीपीसीसाठी सरबजींदर सिंग, सगनप्रीत सिंग आणि अमृतपाल सिंग यांनी आपले लक्ष्य अचूक साधले. हरियाना संघासाठी केवळ अग्यापाल यालाच जाळीचा वेध घेता आला.
निकाल ः उपांत्य फेरी
एमपी हॉकी ऍकॅडमी 4 (श्रेयस धुपे 6वे, अली अहमद 7वे, महंमद कोनेन दाड 35वे, इंगलेम्बा थौउनाजाम 50वे मिनिट) वि.वि. सेल हॉकी ऍकॅडमी 2 (प्रशांत 11वे, केरोबिन लाक्रा 37वे मिनिट) मध्यंतर - 2-1
एसजीपीसी, अमृतसर 0, 3 (सबरजिंदर सिंग, सगनप्रीत सिंग, अमृतपाल सिंग) वि.वि. जय भारत हॉकी भिवानी, हरियाना 0, 1(अग्यापाल) मध्यंतर 0-0