World Cup 2019 : धोनी अनुभव आहे आता स्ट्राईक बदलायचा मार्ग शोध

सुनंदन लेले
Monday, 24 June 2019

अफगाणिस्तानसमोर विजय संपादताना सर्वात मोठी खटकणारी गोष्ट होती डॉट बॉल्सची संख्या. भारताने एकूण 152 चेंडू धाव काढण्याविना नुसतेच खेळून काढले. म्हणजे 51 टक्के होतात. याने दोन तोटे होतात. एकतर धावगतीचा वेग फार कमी होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे फलंदाजीतील लय जाते

वर्ल्ड कप 2019 : न्युझीलंड आणि भारत असे दोनच संघ आहेत ज्यांनी अजून एकही सामना गमावलेला नाही. 5 सामने जिंकून न्युझीलंड गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहे. भारत वि न्युझीलंड सामना पावसामुळे झाला नसल्याने दोघांना त्या लढतीचा प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. न्युझीलंड पेक्षा भारताने एक सामना अजून कमी खेळला आहे. साखळीतील एकूण लढतींपैकी निम्म्याच्या वर सामने झाले असल्याने सगळ्यांना उपांत्य फेरीची गणितं आखणे गरजेचे झाले आहे. 

चार सामने जिंकून भारताने आपले रेकॉर्ड उत्तम ठेवले असले तरी काही वैगुण्य नजरेआड करता येत नाहीयेत. या संदर्भात सचिन तेंडुलकरशी बोलणे झाले असता तो म्हणाला, ‘‘अफगाणिस्तानसमोर विजय संपादताना सर्वात मोठी खटकणारी गोष्ट होती डॉट बॉल्सची संख्या. भारताने एकूण 152 चेंडू धाव काढण्याविना नुसतेच खेळून काढले. म्हणजे 51 टक्के होतात. याने दोन तोटे होतात. एकतर धावगतीचा वेग फार कमी होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे फलंदाजीतील लय जाते’’.  कदाचित मैदानावर सामना बघत असणार्‍या प्रेक्षकांनासुद्धा धोनीने केलेली चूक खटकली असेल म्हणून त्यांनी धोनी बाद होऊन परत येताना नाराजी उघड व्यक्त केली.

अभ्यास करता लक्षात येते की स्ट्राईक रेट फसवी बाब आहे. काय होते की 5 चेंडू नुसते खेळून काढून सहाव्या चेंडूवर षटकार मारला तर फलंदाजाचा स्ट्राईक रेट 100 होतो. पण त्यात 5 चेंडू नुसतेच खेळून काढले ज्याने समोर उभ्या असलेल्या फलंदाजाला खेळायची संधी मिळाली नाही आणि त्याची लय गेली हे लक्षात घेतलेच पाहिजे. त्या अर्थाने अफगाणिस्तान सामन्यात लोकेश राहुल  आणि महेंद्र सिंह धोनीने समोर उभ्या असलेल्या फलंदाजावर थोडा अन्याय केला असे वाटते. भारतीय संघ व्यवस्थापनाला या चुकीकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. 

जम बसवायला धोनी वेळ घेतो ती त्याची शैली आहे हे मान्य केले तरी त्याच्यासारख्या अनुभवी फलंदाजाने स्ट्राईक बदलायला मार्ग शोधला पाहिजे असे सर्व माजी खेळाडूंचे आग्रही म्हणणे आहे. संघ व्यवस्थापनाने लोकेश राहुल आणि धोनीशी या संदर्भात संवाद साधला असल्याचे समजले.

बरीच वर्ष भारतीय संघाच्या यशाला मुख्य करून फलंदाज जबाबदार असायचे. अफगाणिस्तान समोरच्या सामन्यात फलंदाजांनी संघाला अडचणीत टाकले असताना गोलंदाजांनी यशाचा मार्ग शोधण्याची कमाल करून दाखवली हा मुद्दा समालोचकांनी उचलून धरला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी भारतीय संघ पुढील सामन्याच्या तयारीकरता ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सरावाकरता उतरणार आहे. यश मिळाले नसले तरी वेस्ट इंडीज प्रत्येक सामन्यात ठसा उमटवत आहे हे लक्षात घेता 27 तारखेला होणारा सामना मोठे आव्हान निर्माण करणार हे नक्की आहे.


​ ​

संबंधित बातम्या