HappyBirthdayDhoni : अग्नीच्या साक्षीने कॅप्टन कुलसह सात फेरे घेणारी साक्षी

मुकुंद पोतदार
Sunday, 7 July 2019

खालील चारोळींद्वारे आपण धोनी-साक्षीला सलाम करूयात
होम मिनिस्टर असेल कर्कशा नारी
तर कायम झगडत असते स्वारी
सदैव बिघडलेली असते त्याची सवारी
धोनीच्या साक्षीची मात्र कथाच किती न्यारी

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. आपल्या कॅप्टन कुलच्या सौभाग्यवती साक्षी या त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या असतात. इतकेच नव्हे तर वेळ आली तर सौ. धोनी त्याच्या खांद्याला खांदा लावतात आणि आणखी पुढची वेळ आली तर धनी धोनीची प्रतिष्ठा राखण्यासाठी अशक्य वाटणारी गोष्ट कृतीत आणून ती शक्यही करून दाखविते.

हे दाखविणारा एक प्रसंग धोनीच्या चाहत्यांच्या कायम लक्षात राहील. स्पॉट-फिक्सिंगमुळे चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघावर बंदी आली. त्यावेळी आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपर जायंट््स संघाला प्रवेश मिळाला. 2016 मध्ये नवी दिल्लीत फ्रँचायजीचे मालक संजीव गोयंका यांनी वाजत-गाजत जर्सीचे लाँचिंग केले.

कॅप्टन कूलचा सीएसकेमधील गोल्डन टच फ्रँचायजीलाच नव्हे तर चाहत्यांना सुद्धा अपेक्षित होता, पण नवी फ्रँचायजी धोनीसाठी किंवा फ्रँचायजीसाठी धोनी लकी ठरला नाही. 8 संघांच्या क्रमवारीत पुणे संघ शेवटून दुसऱ्या म्हणजे सातव्या स्थानावर फेकला गेला. 14 सामन्यांत 9 पराभव-5 विजय अशी अधोगती झाली. तेव्हा धोनीवर टीका होत होती.

2017चा मोसम धोनीसाठी आणखी भयंकर ठरला. पुणे संघाच्या कर्णधारपदावरून त्याची हकालपट्टी झाली. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथ याला नेतृत्वाचा बहुमान देण्यात आला. धोनी तेव्हा फलंदाज म्हणूनही झगडत होता. फ्रँचायजीचे मालक संजीव गोयंका यांचे बंधू हर्ष यांनी धोनीला सोशल मिडीयावर धारेवर धरले. त्यांच्या ट्वीट धोनीचा अवमान करणाऱ्या होत्या. 

मुंबई इंडियन्सवरील विजयानंतर हर्ष यांनी स्मिथचे गुणगान, तर धोनीचा अपमान करणारे ट्वीट पोस्ट केले. त्यांनी म्हटले होते की, जंगलचा राजा कोण हे स्मिथने सिद्ध केले. त्याने धोनीला पार झाकोळून टाकले. स्मिथची खेळी कर्णधारपदास साजेशी. त्याला कर्णधार नेमण्याची आमची चाल ग्रेटच  म्हणावी लागेल.

दरम्यान, आरपीजीएस संघाचा किंग्ज इलेव्हन पंजाबकडून पराभव झाला. त्यावेळी हर्ष गोयंका यांनी संघाच्या फलंदाजांच्या कामगिरीचा स्क्रीन शॉट पोस्ट केला. त्यात त्यांनी लिहीले होते की, मनोज तिवारी, अजिंक्य रहाणे, डॅनीएल ख्रिस्तीयन यांचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम आहे.

फॉर्मने दगा दिलेल्या धोनीवर त्यावेळी टीका होत होती, पण फ्रँचायजी मालकांनीच त्याच्यावर तोफ डागल्यामुळे सोशल मिडीयावर गदारोळ माजला होता. अशावेळी साक्षीने अर्धांगिनीला साजेशी कृती केली.

तिने इन्स्टाग्रामवर चेन्नई सुपर किंग्जचे हेल्मेट आणि जर्सी घातलेला आपला फोटो पोस्ट केला. त्याच्या बाजूला तिने कर्माविषयीचा एक उताराही टाकला. त्यात लिहीले होते की, पक्षी जिवंत असतो तेव्हा तो मुंग्या खातो. हेच तो मरतो तेव्हा मुंग्या त्याला खातात. काळ आणि स्थळ कोणत्याही क्षणी बदलू शकते. जीवनात कधीही कुणालाही कमी लेखू नका किंवा दुखवू नका. एके दिवशी तुम्ही शक्तीमान असाल, पण लक्षात ठेवा काळ तुमच्यापेक्षा ताकदवान असतो. एका झाडापासून लाखो काड्या तयार होतात, पण लाखो झाडे जाळण्यासाठी एक काडी पुरेशी ठरते. म्हणूनच चांगले राहा आणि चांगले वागा.

या पोस्टद्वारे साक्षीने धनी धोनीचा अपमान करणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते. मुख्य म्हणजे तिने तोंडाचा नव्हे तर मेंदूचा वापर केला होता. असे म्हणतात की, होम मिनीस्टरच्या रुपाने कर्कशा नारी मिळाली तर त्या स्वारीची सवारी सदैव बिघडलेली असते. साक्षीसह सात फेरे घेऊनही सात नंबरची जर्सी परिधान करणारा सत्ताधीश कॅप्टन कुल बिरूद अढळ राखत असेल, त्याचा तोल ढळत नसेल तर साक्षीसाठी जोरदार टाळ्या व्हायलाच हव्यात.

खालील चारोळींद्वारे आपण धोनी-साक्षीला सलाम करूयात
होम मिनिस्टर असेल कर्कशा नारी
तर कायम झगडत असते स्वारी
सदैव बिघडलेली असते त्याची सवारी
धोनीच्या साक्षीची मात्र कथाच किती न्यारी


​ ​

संबंधित बातम्या