गल्लत - हितसंबंधांची की अनर्थ लावणाऱ्या नियमाच्या अर्थाची

मुकुंद पोतदार
Saturday, 6 April 2019

केकेआर आणि दिल्ली कॅपीटल्स यांच्यात 12 एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर लढत होणार आहे. त्यावेळी गांगुली दिल्ली कॅपीटल्सच्या डगआऊटमध्ये बसलेला असेल. अशावेळी तो कॅबचा अध्यक्ष या नात्याने संयोजनाची जबाबदारी कशी काय पेलू शकेल, असा प्रश्न उपस्थित करीत तीन चाहत्यांनी तक्रार केली आहे.

बाल वयातच म्हाताऱ्या माणसाप्रमाणे पेपर वाचायची सवय लागल्यामुळे काही शब्द, शब्दप्रयोग, संज्ञा मेंदूत घर करून राहिल्या आहेत. विशेष म्हणजे हे शब्द शाळा-कॉलेजात शिकताना सिलॅबसचा भाग कधीच नसायचे. (...आणि म्हणूनच ते पक्के लक्षात राहायचे) 

तर असे काही शब्द म्हणजे टाडा, मोक्का, रासुका. मराठी, हिंदी वा इंग्रजी अशा सर्वच वृत्तपत्रांत पहिल्या पानावर या शब्दांचे मथळे असायचे. उच्चारायला सुटसुटीत असे हे शब्द. त्यांचे दिर्घ रुप मात्र अगदी डेडली आहे. टाडा (Terrorist and Disruptive Activities (Prevention) Act), रासुका (राष्ट्रीय सुरक्षा कानून), मोक्का (Maharashtra Control of Organised Crime Act) असे हे Long Form आजही फॉर्मात आहेत. या शब्दप्रयोगांत अलिकडे आणखी एक भर पडली आहे ती म्हणजे हितसंबंधांची गल्लत-Conflict of Interest.

(या दरम्यानच्या काळात मीटू नामक एका भानगडरुपी शब्दप्रयोगाने डोके वर काढले आहे, पण आपण आधी मिठू-मिठू बोलणाऱ्या, T-T-M-M धर्तीवर वेगवेगळ्या मार्गांनी Celebrate केलेल्या, मग एकदम तुटल्यामुळे मी-तू, तू-मी करीत जाहीरपणे हमरीतुमरीवर येणाऱ्या समुहाकडे पुन्हा केव्हा तरी वळूयात....)

आणि आपण वळूयात आजच्या शब्दप्रयोगाकडे. तो म्हणजे हितसंबंधांची गल्लत, तर हे हितसंबंधांची गल्लत म्हणजे एक अजब-गजब असे प्रकरणच आहे. आता थेट विषयाला हात घालताना आपण क्रिकेटच्या मैदानावर येऊयात. तेव्हा हे प्रकरण देशप्रेमी, जिगरबाज चँपीयन्सची डोकेदुखी बनल्याचे दिसून येते. राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि आता सौरभ गांगुली अशी उदाहरणे यासाठी पुरेशी आहेत.

यातील गांगुली म्हणजे दादाच्या संदर्भात आपण Case Study करणार आहोत. तो कॅबचा (Cricket Association of Bengal-बंगाल क्रिकेट संघटना) अध्यक्ष आहे. अलिकडेच त्याने आयपीएलमधील दिल्ली कॅपीटल्स संघाचा सल्लागार म्हणून पद स्विकारले. कॅबशी संबंधित आयपीएलची एक फ्रँचायजी आहे, जिचे नाव कोलकाता नाईट रायडर्स अर्थात केकेआर. केकेआर आणि दिल्ली कॅपीटल्स यांच्यात 12 एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर लढत होणार आहे. त्यावेळी गांगुली दिल्ली कॅपीटल्सच्या डगआऊटमध्ये बसलेला असेल. अशावेळी तो कॅबचा अध्यक्ष या नात्याने संयोजनाची जबाबदारी कशी काय पेलू शकेल, असा प्रश्न उपस्थित करीत तीन चाहत्यांनी तक्रार केली आहे.

बीसीसीआयचे लोकपाल न्या. डी. के. जैन यांनी दादाला नोटीस बजावली असून सात दिवसांत खुलासा करायला सांगितले आहे. एखादा सच्चा कलाकार भूमिका साकारत तेव्हा तो त्या भूमिकेत शिरतो असे म्हणतात. म्हणजे तो कलाकार ती भूमिका हिट झाल्यानंतर अशी मुलाखत देत असतो. याच धर्तीवर आपणही हा विषय कायद्याशी-नियमाशी संबंधित असल्यामुळे वकीलाच्या भूमिकेत शिरूयात. त्यासाठी आपल्याला जास्त डोके खाजवावे लागणार नाही. भूमिकेत शिरताच म्हणजे अगदी वकीलाचा काळा कोट जरी डोळ्यासमोर आणला तरी आपल्याला काहीतरी Clue-Hint मिळाल्याशिवाय राहात नाही.

दादा आपला असल्यामुळे आपण त्याच्या बाजूने युक्तीवाद करणार आहोत, हे सांगणे न लगे असे न म्हणता स्पष्ट सांगतो. कारण या कोर्टकचेरीमध्ये साक्षीदार फिरण्याचे (म्हणजे नंतर त्यांच्यात कुणीतरी शिरते आणि मग साक्ष फिरते...) प्रकार सर्रास घडत असतात.

तर वकीलाच्या भूमिकेत शिरल्यानंतर आपण 12 एप्रिलच्या तारखेचा विचार करूयात. त्यादिवशी दादा दिल्ली कॅपीटल्सच्या डगआऊटमध्ये बसलेला असेल. जर तेव्हा तो संयोजनाची जबाबदारी पार पाडू शकणार नाही असे आपण क्षणभर गृहीत धरून तक्रारदारांना प्रतिप्रश्न करूयात. (होय, तसा आपल्याला अधिकार आहोत, याचे कारण दादा आपला अशील आहे आणि त्यामुळे आपल्याला उलटतपासणीचा अधिकार आहेच. -च- हे अक्षर जोर देऊन -च्च- असे उच्चारायचे असते, कारण वकीली भाषा अशीच असते.)

केकेआरचा दिल्ली कॅपीटल्सविरुद्ध तो घरच्या मैदानावरील एकमेव सामना नाही. याशिवाय केकेआर होम ग्राऊंडवर इतर सहा सामने खेळणार आहे. यात 24 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध, तर 27 एप्रिल रोजी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध असे दोन सामने झाले आहेत. या दोन्ही दिवशी दादा दोन्ही पैका एकाही संघाच्या डगआऊटमध्ये असाचा प्रश्नच उद्भवत नाही. मुख्य म्हणजे तो त्यादिवशी ईडन गार्डन्सवरील त्याच्या प्रेसीडेंट््स चेंबरमध्ये उपस्थित होता असेही नाही. आयपीएल सुरु झाल्यामुळे तो दिल्ली कॅपीटल्स संघाबरोबरच असणार हे उघड आहे.

ही परिस्थिती विशद करून आपण उलटतपासणीची प्रक्रिया पुढे नेत प्रतिप्रश्न करायला लागूयात. म्हणजे असे की या दोन्ही दिवशी कॅब अध्यक्ष या नात्याने गांगुलीने संयोजनाची जबाबदारी पार पाडली होती का, असल्यास कशी पार पाडली, नसल्यास का नाही, मग केवळ 12 एप्रिलकडे बोट करून अशी तक्रार करणाऱ्यांना नेमके काय सुचवायचे आहे. याआधीच्या दोन व यानंतरच्या चार अशा सामन्यांच्यावेळी दादाच्या संयोजकाच्या भूमिकेला कसा न्याय मिळणार आहे, असे हे तक्रारदार का म्हणत नाहीत.

यावरून तक्रारदारांच्या अर्जातच दम नाही असे आपण मिलॉर्डच्या निदर्शनास आणून देऊयात. यानंतर आपला युक्तीवाद आणखी पुढे नेऊयात. दादा कॅबचा अध्यक्ष आहे, त्याच्याकडे संयोजनाची जबाबदारी आहे याचा अर्थ त्याने गेटवर थांबून तिकीटे तपासून प्रेक्षकांना आत सोडायचे, टॉसच्या वेळी सामनाधिकाऱ्यांच्या बाजूला थांबून त्यांना नाणे द्यायचे, खेळपट्टीवरची कव्हर काढायची, फ्लडलाईटचे स्वीच ऑन करायचे, स्ट्रॅटेजीक टाईमआऊच्यावेळी लाईव्ह स्क्रीनच्या बाजूला थांबून काऊंटडाऊनचे आकडे रिमोट कंट्रोलने बदलायचे, मग सामना संपल्यानंतर शेवटचा प्रेक्षक जाईपर्यंत स्टेडियममध्ये थांबून राहायचे असे बरेच काही करणे अपेक्षित आहे का. तसे पाहिले तर याच्या अध्येमध्ये सुद्धा अनेक मुद्दे उपस्थित करून आपण प्रश्नांची सरबत्ती करू शकतो. पण शेवटी मिलॉर्डचा जास्त वेळ घालवायचा नसतो...(नाही तर ते हातातला हातोडा टेबलावर आपटतात...)

तर या मिलॉर्डना इतकेच सांगायचे की कॅबचा अध्यक्ष या नात्याने दादाचे केआरए म्हणजे अशी वर नमूद केलेली (वरवरची हलकीसलकी) कामे नाहीत. दादा हा नुसताच दादा नव्हे तर Prince of Kolkata आहे. गत शतकाच्या अखेरीस मॅचफिक्सींगचे चक्रीवादळ आल्यानंतर बंगालच्या उपसागरी कक्षेत राहणाऱ्या या लढवय्याने भारतीय क्रिकेटची नौका पैलतिरी लावली. केवळ दैवाची साथ मिळाली नाही म्हणून अन्यथा तो 2003 मध्ये जगज्जेता झाला असता.

त्याच्या बाबतीत हितसंबंधांची मधील ह...(वेलांटी द्यायचा प्रश्नच नाही) आणि गल्लत मधला ग उच्चारणे हाच देशद्रोह ठरतो...(असे पोटातले वाक् ओठापर्यंत आले तरी न उच्चारता आपण मिलॉर्डच्या कोर्टात चेंडू सोपवूयात.) इथे गल्लत हितसंबंधांची नसून नियमाचा अर्थ लावताना अनर्थ करण्याची आहे, हे मिलॉर्डच्या लक्षात येईलच. 

तर आता आपल्याला प्रतिक्षा आहे ती तारखेची. ती करूयात. बाकी दादा आपला समर्थ आहेच. त्याने यापेक्षा भारी-भारी वादळं पचविली आहेत. हितसंबंधांची गल्लत हे प्रकरण दादासाठी चहाच्या पेल्यातले नव्हे तर कटींगच्या ग्लासातले वादळ नव्हे तर वाऱ्याची इवलिशी झुळूक आहे.


​ ​

संबंधित बातम्या