प्रो कबड्डीतील उपांत्य लढतीत मुंबईचे बंगालविरुद्ध अभिषेक-अर्जुन अस्त्र

संजय घारपुरे
Wednesday, 16 October 2019

-साकळीतील यश अपयशाच्या मालिकेनंतर उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणारा यु मुम्बा संघ आता बंगाल वॉरियर्सचे आव्हान पेलम्यास सज्ज आहे.

-दुसरीकडे बंगाल वॉरियर्सला मनिंदर िसंगच्या तंदुरुस्तीची चिंता असेल.

-दुसऱ्या उपांत्य लढतीत पवन  वि. नविनकुमार असा सामना रंगेल

अहमदाबाद - प्रो कबड्डीचा लिलाव झाला, त्या वेळी एकही आक्रमक नसलेला मुंबई संघ किती मजल मारणार, अशी विचारणा केली जात होती, पण स्टार प्लेयर्स नव्हे, तर चांगला खेळ करणारा संघ जिंकतो आणि त्यातून स्टार निर्माण होतात. हा मुंबई कर्णधार फझल अत्राचली आणि मार्गदर्शक संजीव कुमार यांचा विश्‍वास किती सार्थ ठरणार याचे उत्तर उद्याच्या (ता. 16) उपांत्य लढतीत मिळेल. कर्णधार मनिंदर पूर्णपणे फिट नाही, तो खेळणारच नाही असे सांगत अत्राचलीने मानसिक चढायांना सुरवात केली आहे आणि मनिंदरच्या अनुपस्थितीत मुंबईला रोखणे बंगालला अवघडच जाईल. त्याचवेळी अभिषेक सिंग आणि अर्जुन देशवाल ही आक्रमक जोडी मुंबईचा दबदबा कायम राखण्यास उत्सुक असेल. 
मुंबई-बंगाल लढत म्हणजे फाझलचा बचाव आणि मनिंदरचे आक्रमण अशीच मानली जात आहे, याबाबत फाझलने थेट मनिंदर अनफिट आहे, तो कुठे खेळणार आहे अशी विचारणा केली. सामन्यापूर्वीच्या सरावातही मनिंदर पूर्ण तंदुरुस्त वाटत नव्हता. त्याच्या सहभागाबाबत शंकाच आहे. बंगालचे मार्गदर्शक बी. सी. रमेश यांनी त्याच्या सहभागाबाबत थेट काही सांगितले नाही, पण त्याचवेळी मनिंदर खेळला तर आमची बाजू खूपच सरस असेल अशी टिप्पणी केली. आता समजा मनिंदर नसला तरी प्रभंजन आणि सुकेश हेगडे हे आक्रमक चांगले आहेत. आमच्याकडे बचावही भक्कम आहे, असेही त्यांनी सांगितले. 
आमच्या संघात स्टार आक्रमक नाहीत. असे म्हणणाऱ्यांची तोंडे आम्ही गप्प केली आहेत. संघाच्या यशाने खेळाडू स्टार होतात. त्यासाठी सांघिक कामगिरी मोलाची असते. आम्ही हेच दाखवून देत आहोत. आमचा बचाव स्थिरावत आहे, असे सांगताना फझल अत्राचलीने मनिंदर खेळणारच नाही, तर त्याची आणि माझी लढत होण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे सांगत बंगालवरील दडपण वाढवले; तर नबीबक्ष हा इराणमधील स्पर्धेत माझा कायम प्रतिस्पर्धी असतो. आम्ही सामन्यातील प्रत्येक परिस्थितीचा विचार करून योजना तयार केलेली असते. हेच उपांत्य लढतीच्या वेळी असेल, असेही फझलने सांगितले. 

नवीन सरस की पवन? 
प्रो कबड्डीतील पहिली उपांत्य लढत बंगळूर बुल्स आणि दिल्ली दबंग यांच्यात होईल. पवन शेरावतच्या कामगिरीच्या जोरावर बंगळूरने धडाका कायम राखला आहे. आमची पवनविरुद्धची योजना तयार आहे. त्याची पकड कशी करायची याची आमची योजना तयार आहे, ती सामन्यात नक्कीच अमलात येईल, चुका कमी केल्या की लढत सोपी होते, याकडेच आमचे लक्ष असेल, असे दिल्लीचे मार्गदर्शक कृष्ण कुमार हुडा यांनी सांगितले. 

मुंबई-बंगाल लढतीपूर्वी... 
- फझलचे बंगालविरुद्ध पकडीचे सहा गुण, पण तीन पकडी. त्याचवेळी संदीप नरवाल आणि सुरिंदरचे पकडीत बंगालविरुद्ध अपयश. 
- अर्जुन देशवालचे बंगालविरुद्धच्या दोनही लढतीत सुपर टेन. 
- अर्जुन वगळता मुंबईचे अन्य आक्रमक बंगालविरुद्ध फारसे यशस्वी नाही. 
- मनिंदरची अनुपस्थिती बंगालसाठी मुंबईविरुद्ध फारशी निर्णायक नसेल, मनिंदरचे मुंबईविरुद्धच्या दोन्ही लढतीत मिळून बारा गुण, पण त्या वेळी चार पकडी. 
- जीवा कुमार आणि बलदेव सिंग हे बंगालचे बचावपटू मुंबईविरुद्ध यशस्वी. 
- मोसमातील मुंबईचे विजय प्रामुख्याने एकतर्फी; तर बंगालचे चुरशीच्या लढतीत. 
- अभिषेक-अर्जुनने जेव्हा दोघांनी किमान पाच गुण घेतले, त्या वेळी मुंबईची सरशी. 
 


​ ​

संबंधित बातम्या