French Open 2019 : नदाल, स्टेफानोसची आगेकूच 

वृत्तसंस्था
Thursday, 30 May 2019

मातब्बर रॅफेल नदाल आणि प्रतिभाशाली आव्हानवीर स्टेफानोस त्सित्सिपास यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत तिसरी फेरी गाठली. महिला एकेरीत स्लोआनी स्टीफन्स आणि गार्बीन मुगुरुझा या प्रमुख खेळाडूंनी आगेकूच केली. 

पॅरिस : मातब्बर रॅफेल नदाल आणि प्रतिभाशाली आव्हानवीर स्टेफानोस त्सित्सिपास यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत तिसरी फेरी गाठली. महिला एकेरीत स्लोआनी स्टीफन्स आणि गार्बीन मुगुरुझा या प्रमुख खेळाडूंनी आगेकूच केली. 

नदालने पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या जर्मनीच्या यान्निक मॅडेनला 6-1, 6-2, 6-4 असे पराभूत केले. स्टेफानोसने बोलोव्हियाच्या ह्युगो डेलीवर 4-6, 6-0, 6-3, 7-5 अशी मात केली. 4-4 अशा बरोबरीनंतर ह्युगोने सलग दोन गेम जिंकत पहिला सेट जिंकला. त्यानंतर स्टेफानोसने "टॉप गिअर' टाकत आक्रमण केले. त्याने दुसरा सेट "लव्ह'ने जिंकत बरोबरी साधली. मग डेलीनचा खेळ निष्प्रभ ठरत गेला. 

महिला एकेरीत अमेरिकेची स्लोआनी स्टीफन्स आणि स्पेनची गार्बीन मुगुरुझा यांनी तिसरी फेरी गाठली. सातव्या मानांकित व 2017 मधील अमेरिकन विजेत्या स्लोआनीने स्पेनच्या सारा सोरीबेस टोर्मोला 6-1, 7-6 (7-3) असे पराभूत केले. सारा 75व्या स्थानावर आहे. स्लोआनीने गेल्या वर्षी उपविजेतेपद मिळविले होते. मुगुरुझाने 172व्या स्थानावरील स्वीडनच्या योहाना लार्सनवर 6-4, 6-1 अशी मात केली. आता मुगुरुझाची नवव्या मानांकित युक्रेनच्या एलिना स्विटोलीनाशी लढत होईल. स्विटोलीनाला देशभगिनी कॅटरीना कोझ्लोवाच्या माघारीमुळे पुढे चाल मिळाली.


​ ​

संबंधित बातम्या