कुमार राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत महाराष्ट्राची इशिका वेगवान धावपटू

वृत्तसंस्था
Sunday, 3 November 2019

-  महाराष्ट्राच्या कुमार धावपटूंनी राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत आपली आगेकूच दुसऱ्या दिवशीही कायम राखली.

- स्पर्धेत रविवारी महाराष्ट्राने एका सुवर्णपदकासह 1 रौप्य आणि चार ब्रॉंझ अशा सहा पदकांची कमाई केली.

- आजचे एकमेव सुवर्णपदक महाराष्ट्राला इशिका रानडे हिने 100 मीट शर्यतीत मिळवून दिले.

गुटुंर (आंध्र प्रदेश) - महाराष्ट्राच्या कुमार धावपटूंनी राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत आपली आगेकूच दुसऱ्या दिवशीही कायम राखली. स्पर्धेत रविवारी महाराष्ट्राने एका सुवर्णपदकासह 1 रौप्य आणि चार ब्रॉंझ अशा सहा पदकांची कमाई केली. आजचे एकमेव सुवर्णपदक महाराष्ट्राला इशिका रानडे हिने 100 मीट शर्यतीत मिळवून दिले. पहिल्या दिवशी महाराष्ट्राने दोन सुवर्ण आणि एक ब्रॉंझपदक मिळविले होते. 
मुलींच्या 14 वर्षांखालील गटात इशिकाने 12.84 सेकंद अशी वेळ देत सोनेरी यश मिळविले. याच शर्यतीत मुलांच्या वयोगटात मात्र महाराष्ट्राच्या ओम इतकेलवार ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. अन्य स्पर्धा प्रकारात महाराष्ट्राच्या सुदेष्णा शिवणकर हिला मुलींच्या 18 वर्षांखालील गटात 100 मीटर शर्यतीत ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. तिने 12.12 सेकंद वेळ दिली. तेलंगणाच्या जीवांजी दिप्ती हिने 11.94 सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदक मिळविले. मुलींच्या 18 वर्षांखालील गटात उंच उडीत महाराष्ट्रातील श्रुती कांबळे (1.65 मीटर) ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली. याच वयोगटात थाळी फेक प्रकारात आदिती बुगड हिला (43.61 मीटर) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या 16 वर्षांखालील गटात महाराष्ट्राचा रिजबुल हक 400 मीटर, तर ऱ्हिदय जाना 100 मीटर शर्यतीत ब्रॉंझपदकाचे मानकरी ठरले. 
दिल्लीच्या रितिक मलिक याने मुलांच्या 18 वर्षांखालील गटात 100 मीटर शर्यत 10.65 सेकंदात जिंकताना वेगवान धावपटूचा मान मिळविला. मुलींच्या 16 वर्षांखालील गटात कर्नाटकाच्या शेली सिंग हिने 6.15 मीटर अशा नव्या स्पर्धा विक्रमासह लांब उडीत सुवर्ण कामगिरी केली. दिल्लीच्या चंदा हिने मुलींच्या 20 वर्षांखालील गटात 4 मिनीट 17.18 सेकंद वेळ देत सुवर्णपदक मिळविले. केरळच्या निव्या कुमार हिने मुलींच्या 20 वर्षांखालील गटातच पोल व्हॉल्ट प्रकारात सोनेरी यश मिळविले. तिने 3.75 मीटर उडी मारली. 


​ ​

संबंधित बातम्या