क्रमवारीत पहिल्या शंभरात येण्याचे उद्दिष्ट ः मालविका

वृत्तसंस्था
Wednesday, 2 October 2019

- लागोपाठ दोन चॅंलेजर्स स्पर्धेत विजेतेपद मिळवून वरिष्ठ गटात अश्‍वासक पाऊल टाकणारी भारताची युवा बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड हिने जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभरात स्थान मिळविण्याचे प्राथमिक उद्दिष्ट ठेवले आहे. 

- दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळविताना मालविकाचा खेळ जबरदस्त राहिला होता. या दोन स्पर्धेत ती केवळ एकच गेम हरली

- मालविका आता 9 ते 13 ऑक्‍टोबरदरम्यान आंतरराष्ट्रीय मालिकेतील बहारिन येथे होणाऱ्या स्पर्धेत खेळणार आहे.

नवी दिल्ली - लागोपाठ दोन चॅंलेजर्स स्पर्धेत विजेतेपद मिळवून वरिष्ठ गटात अश्‍वासक पाऊल टाकणारी भारताची युवा बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड हिने जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभरात स्थान मिळविण्याचे प्राथमिक उद्दिष्ट ठेवले आहे. 
वरिष्ठ गटातील पदार्पणात नागपूरच्या 18 वर्षीय मालविकाने प्रथम मालदीव आणि नंतर नेपाळ आंतरराष्ट्रीय मालिकेतील स्पर्धेत विजेतेपद मिळविले. मालविका म्हणाली, ""गेले दोन आठवडे माझ्यासाठी खास गेले. वरिष्ठ गटातील पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळविले. पाठोपाठ नेपाळमध्येही बाजी मारली. ही सुरवात आश्‍वासक असली, तरी भविष्यात वाटचाल करताना माझ्यासमोरील आव्हाने मोठी आहेत याची जाणीव मला आहे.'' 
दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळविताना मालविकाचा खेळ जबरदस्त राहिला होता. या दोन स्पर्धेत ती केवळ एकच गेम हरली. आपल्या खेळविषयी ती म्हणाला, ""दोन आठवडे सातत्य राखण्यात मला यश आले. आता हे सातत्य मला टिकवायचे आहे. भविष्यातील आव्हानांचा विचार करतान मला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक कणखर बनायचे आहे. खेळातील सर्वांगिण विकास मला साधायचा आहे. वयाच्या अठराव्यावर्षी वयाने आणि अनुभवाने अधिक असलेल्या खेळाडूंविरुद्ध खेळताना मला अधिक ताकद आणि क्षमतेची गरज आहे.'' 
मालविका आता 9 ते 13 ऑक्‍टोबरदरम्यान आंतरराष्ट्रीय मालिकेतील बहारिन येथे होणाऱ्या स्पर्धेत खेळणार आहे. अनुभवाच्या दृष्टीने अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची गरज आहे. या स्पर्धा खेळून आंतरराष्ट्रीय चॅलेंजर्स मालिकेत खेळण्याचे गुण मला कमवायचे आहेत. कारकिर्दीत लवकरात लवकर क्रमवारीत पहिल्या शंभरात मला स्थान मिळवायचे आहे, असे तिने सांगितले. 
ऑलिंपिक आणि जगज्जेता लिन डॅन तिचा आदर्श असून, त्याला भेटण्याची तिची इच्छा अजून पूर्ण झालेली नाही. ती म्हणाली, ""लिन माझा आदर्श खेळाडू आहे. पण, मी अजून त्याचा खेळ थेट पाहिलेला नाही. थॉमस करंडकासाठी तो भारतात आला तेव्हा माझे मित्र त्यांचे सराव सत्र पाहण्यासाठी गेले होते. पण, स्थानिक स्पर्धा आणि परीक्षेमुळे मी जाऊ शकले नाही. भविष्यात मला त्याला भेटण्याची खूप इच्छा आहे.'' 
--------------- 
अभ्यासातही मालविका हुशार 
बॅडमिंटनमधील प्रगतीबरोबक शालेय अभ्यासातही ती हुशार आहे. दहावीत तिला 95 टक्के मार्क्‌स मिळाले होते. त्यानंतर तिने विज्ञान शाखेची निवड करताना गणित, भौतिक आणि रसायन शास्त्र विषयांची निवड केली. जीवशास्त्रासाठी अधिक अभ्यास आवश्‍यक असतो. बॅडमिंटनची कारकीर्द सांभाळता ते शक्‍य नसल्यामुळे तिने जीवशास्त्राची निवड केली नाही. 


​ ​

संबंधित बातम्या