World Cup 2019 : किवींचा भारताला धक्का; पहिल्या चाचणीतच अपेक्षांना टाचणी

वृत्तसंस्था
Saturday, 25 May 2019

किवींची सुरवात खराब झाली. बुमराने मुन्रोला दुसऱ्याच षटकात पायचीत केले. मुन्रोने पहिल्या षटकात भूवीचा चेंडू सीमापार करीत खाते उघडले होते. जम बसलेल्या गप्टीलला पंड्याने बाद केले. त्यानंतर मात्र विल्यमसन-टेलर यांनी 114 धावांची भागीदारी रचली. त्यांनी संघाचे दिडशतक पार केले.

लंडन : संभाव्य विजेते असे बिरुद घेऊन इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी पहिल्याच सराव सामन्यात पराभवाचा धक्का बसला. न्यूझीलंडने भारतावर सहा विकेट राखून मात केली. मातब्बर फलंदाज जेमतेम पावणे दोनशेचा टप्पा कसाबसा पार करू शकले. त्यामुळे गोलंदाजांना पुरेसे पाठबळ मिळाले नाही. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. 

कर्णधार केन विल्यमसन व अनुभवी रॉय टेलर यांनी भारतीय फलंदाजांसमोर संयम-आक्रमण असा मिलाफ साधणाऱ्या खेळाचा वस्तुपाठ निर्माण केला. 

किवींची सुरवात खराब झाली. बुमराने मुन्रोला दुसऱ्याच षटकात पायचीत केले. मुन्रोने पहिल्या षटकात भूवीचा चेंडू सीमापार करीत खाते उघडले होते. जम बसलेल्या गप्टीलला पंड्याने बाद केले. त्यानंतर मात्र विल्यमसन-टेलर यांनी 114 धावांची भागीदारी रचली. त्यांनी संघाचे दिडशतक पार केले. त्या दरम्यान चहल-कुलदीप-जडेजा हे फिरकी त्रिकुट चालले नाही. चहलने विल्यमसनला, तर जडेजाने टेलरला बाद केले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. 

त्यापूर्वी, भारतीय फलंदाजांनी गोलंदाजीस अनुकूल वातावरणात आपली चाचणी करण्याचे ठरवले, पण ट्‌वेंटी 20 मानसिकतेतून पूर्ण बाहेर येण्याचे आव्हान त्यातच इंग्लंडमध्ये सकाळच्या सत्रात होणारा गोलंदाजांचा फायदा यामुळे भारतीय फलंदाजी कोलमडली. क्रिकेटमध्ये आकडेवारी किती फसवी असते हे भारताचा धावफलक पाहिल्यावर लक्षात येते. धावफलक भारताचा डाव 39.2 षटकांत 179 हे दाखवतो, पण संघाची अवस्था 3 बाद 24, 5 बाद 77, 8 बाद 115 अशी केविलवाणी होती. जगातील सर्वोत्तम फलंदाजी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या संघाकडून हे अपेक्षित नव्हते. आयपीएलमधील फलंदाजीस अनुकूल खेळपट्ट्या, तेच वातावरण तसेच नियमात जवळपास दोन महिने खेळल्यावर 50 षटकांच्या क्रिकेटला जुळवून घेणे आव्हान असते. त्यातच वातावरण फलंदाजीपेक्षा गोलंदाजीस पोषक होते. त्यात व्हायचे तेच झाले. 

भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांपैकी केवळ हार्दिक पंड्याने तिशी गाठली. चौथ्या क्रमांकावरील केएल राहुलपेक्षा कमी धावा रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीवीरांनी केल्या. मूव्ह होणाऱ्या चेंडूचा सामना करण्याची सवय गेल्या दोन महिन्यांत मोडली आहे, त्याचेच परिणाम दिसले. 

वेगाने आत आलेल्या चेंडूवर आपण चकलो हे रोहित शर्माने स्वीकारलेच नाही. त्याने पायचीत दिल्यावर लगेच रिव्ह्यू घेतला, पण पंचांचा निर्णय योग्य असल्याचे काही सेकंदात कळले. शिखर धवनला चेंडूने बॅटला कधी स्पर्श केला तेच कळले नाही. केएल राहुलने चेंडू यष्टीवर ओढवून घेतला. कोहलीला हळुवार चेंडूचा अंदाज आला नाही. दिनेश कार्तिकचा फ्लिक सरळ क्षेत्ररक्षकाकडे गेला. पुढे सरसावत चेंडू फ्लिक करताना धोनीलाच आत्मविश्‍वास नव्हता. तत्पूर्वी पंड्या काहीशा बाहेर जाणाऱ्या चेंडूवर चकला. 

भारताच्या आघाडीच्या फलंदाजांत टायमिंगचा अभाव होता, तेच नेमके जडेजाने साधले. त्याने चेंडूस धाव यापेक्षा जास्त गती राखली. त्याने आत्मविश्‍वासपूर्वक खेळी करीत आपण तळाच्या फलंदाजांच्या साथीत धावा वाढवू शकतो हे दाखवले. ट्रेंट बोल्टने चांगलेच हादरवल्यावर जडेजाचे अर्धशतक दिलासादायक होते. 

संक्षिप्त धावफलक- भारत ः 39.2 षटकांत 179 (रोहित शर्मा 2- 6 चेंडू, शिखर धवन 2- 7 चेंडू, विराट कोहली 18- 24 चेंडूंत 3 चौकार, केएल राहुल 6- 10 चेंडूंत 1 चौकार, हार्दिक पंड्या 30- 37 चेंडूंत 6 चौकार, महेंद्रसिंह धोनी 17- 42 चेंडूंत 1 चौकार, दिनेश कार्तिक 4- 3 चेंडूंत 1 चौकार, रवींद्र जडेजा 54- 50 चेंडूंत 2 षटकार, भुवनेश्‍वर कुमार 1, कुलदीप यादव 19- 36 चेंडूंत 2 चौकार, महंमद शमी नाबाद 2, अवांतर 24- 4 वाइड आणि 12 वाइडसह, ट्रेंट बोल्ट 6.2-1-33-4, जेम्स नीशान 6-1-26-3). पराभूत विरुद्ध न्यूझीलंड ः 37.1 षटकांत 4 बाद 180 (मार्टिन गप्टील 22-43 चेंडू, 3 चौकार, केन विल्यमसन 67-87 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, रॉस टेलर 71-75 चेंडू, 8 चौकार, हेन्री निकोल्स नाबाद 15, भुवनेश्वर 4-0-27-0, बुमरा 4-2-2-1, शमी 4-0-16-0, पंड्या 4-0-26-1, चहल 6-0-37-1, कुलदीप 8.1-0-44-0, जडेजा 7-0-27-1) 


​ ​

संबंधित बातम्या