निर्णायक गोलनंतर चाहत्यांना जिंकण्याचा नेमारचा प्रयत्न

वृत्तसंस्था
Sunday, 29 September 2019

-सुपरस्टार नेमारने पीएसजीला लीग वनमध्ये बॉर्डऑक्‍सविरुद्ध 1-0 असा विजय मिळवून दिला. जगातील सर्वांत महागडा फुटबॉलपटू नेमारने त्यानंतर चाहत्यांना जिंकण्याचा प्रयत्न केला

-रेयाल माद्रिदने ऍटलेटिको माद्रिदला लिगामध्ये अव्वल क्रमांक राखला. रेयालने ग्रॅनाडा तसेच ऍटलेटिकोला एका गुणाने मागे टाकले

-लिव्हरपूलने सलग सातवा विजय मिळविताना शेफील्ड युनायटेडला 1-0 हरविले.

पॅरिस - सुपरस्टार नेमारने पीएसजीला लीग वनमध्ये बॉर्डऑक्‍सविरुद्ध 1-0 असा विजय मिळवून दिला. जगातील सर्वांत महागडा फुटबॉलपटू नेमारने त्यानंतर चाहत्यांना जिंकण्याचा प्रयत्न केला. 
नेमारने पुन्हा संघाच्या विजयात निर्णायक कामगिरी केली, तरीही चाहते त्याच्यावर खूष नाहीत. तो पीएसजी सोडून बार्सिलोनास जाणार, ही चाहत्यांची खात्रीच पटली आहे. माझा गोल महत्त्वाचा ठरला. आता तरी चाहते खूष झाले असतील, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. "चाहते हे गर्लफ्रेंडसारखे असतात. चाहतेही गर्लफ्रेंडसारखेच तुमच्यावर चिडतात, रागावतात. पण, त्याचवेळी भरपूर प्रेमही करतात. मी पीएसजीला सर्व काही देण्यासाठीच आलो आहे. हा माझा संघ आहे. क्‍लबला यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त गोल करण्याचा माझा प्रयत्न आहे,' असे नेमारने सांगितले. 
दरम्यान, मोसमात प्रथमच किलीन एम्बापे आणि नेमार प्रथमच एकत्र खेळले. अद्याप पूर्ण तंदुरुस्त नसलेला एम्बापे या सामन्यासाठी राखीवच होता. पण, संघाचा गोल होत नाही, हे बघितल्यावर त्याला उतरविण्यात आले. त्याने नेमारच्या साथीत रचलेल्या चालीवरच गोल झाला. 

रेयालचे अग्रस्थान कायम 
माद्रिद ः रेयाल माद्रिदने ऍटलेटिको माद्रिदला लिगामध्ये अव्वल क्रमांक राखला. रेयालने ग्रॅनाडा तसेच ऍटलेटिकोला एका गुणाने मागे टाकले आहे. ऍटलेटिकोचा धसमुसळा तसेच गर्दी करणारा बचाव भेदणे अवघड असते, असे रेयाल कर्णधार सर्जिओ रामोसने सांगितले. रेयालने भक्कम बचाव करीत चेंडूवर जास्त वर्चस्व राखलेल्या ऍटलेटिकोस गोलपासून रोखले. 

मॅंचेस्टर सिटीचे आव्हान कायम 
लंडन ः मॅंचेस्टर सिटीने एव्हर्टनचे आव्हान परतवत आघाडीवरील लिव्हरपूलवरील दडपण कायम राखले. टॉटनहॅमने साऊदम्प्टनला हरवून अव्वल चार संघांत प्रवेश केला, तर चेल्सीने घरच्या मैदानावरील पहिला विजय अखेर मिळविला. लिव्हरपूलने सलग सातवा विजय मिळविताना शेफील्ड युनायटेडला 1-0 हरविले. लिव्हरपूलला विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला, तसेच 3-1 बाजी मारलेल्या सिटीलाही प्रयत्नांची शर्थ करावी लागली. लीग कपमध्ये पराजित झालेल्या संघात साऊदम्प्टनने अकरा बदल केले, तरीही ते टॉटनहॅमविरुद्ध पराभूतच झाले. टॉटनहॅमचा मोसमातील नऊ सामन्यांतील हा केवळ तिसरा विजय आहे. 


​ ​

संबंधित बातम्या