मेरीबरोबर निवड चाचणी घ्या

वृत्तसंस्था
Thursday, 17 October 2019

- कुमार गटातील जगज्जेती बॉक्‍सिंग खेळाडू निखत झरीन हिने ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी भारतीय संघ जाहीर करण्यापूर्वी अनुभवी मेरी कोमबरोबर माझी निवड चाचणी घ्या, अशी विनंती केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांना केली आहे

-  मेरीने 51 किलो  वजनी गटातून अलीकडेच जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत आठवे जागतिक पदक पटकाविले. मात्र, या स्पर्धेसाठीदेखील मेरीची निवड चाचणीशिवाय थेट करण्यात आली होती.

नवी दिल्ली - कुमार गटातील जगज्जेती बॉक्‍सिंग खेळाडू निखत झरीन हिने ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी भारतीय संघ जाहीर करण्यापूर्वी अनुभवी मेरी कोमबरोबर माझी निवड चाचणी घ्या, अशी विनंती केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांना केली आहे. ऑलिंपिक पात्रता फेरी पुढील वर्षी फेब्रुवारीत चीन येथे होणार आहे. 
"आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकण्याची किंवा संधी दाखविण्याची संधी प्रत्येकाला मिळायला हवी. नियमानुसार ऑलिंपिक पदक विजेतीस या स्पर्धेत खेळण्यासाठी निवड चाचणीतून पात्रता सिद्ध करावी लागेल. लहानपणापासून मेरीचाच आदर्श घेऊन आपण या खेळाची निवड केली. मेरी नक्कीच सध्या एक आदर्श खेळाडू आहे. म्हणूनच केवळ ऑलिंपिक खेळण्याचे उद्दिष्ट ठेवताना तिने निवड चाचणीपासून पळून जाण्याचा मार्ग शोधू नये,' असे तिने क्रीडामंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 
निखत झरीन ही 51 किलो वजनी गटात मेरी कोमची प्रतिस्पर्धी मानली जाते. मेरीने याच वजनी गटातून अलीकडेच जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत आठवे जागतिक पदक पटकाविले. मात्र, या स्पर्धेसाठीदेखील मेरीची निवड चाचणीशिवाय थेट करण्यात आली होती. तेव्हादेखील अगदी ऐनवेळी निवड चाचणी रद्द झाल्याचे निखतला कळविण्यात आले होते. 
निखतने क्रीडा मंत्रालयाला कितीही चाचणी घेण्याची विनंती केली असली, तरी क्रीडा मंत्रालय या प्रसंगात प्रत्यक्ष लक्ष घालू शकत नाही. ऑलिंपिक संघटनेच्या नियमानुसार अशी कृती ऑलिंपिक चळवळीचा भंग ठरू शकते. अर्थात आंतरराष्ट्रीय महासंघाने विनंती केल्यास क्रीडा मंत्रालय विशेष बाब म्हणून या प्रकरणात लक्ष घालू शकते. 
--------------- 
मी माझ्या किंवा मेरीच्या हिताचा विचार करत नाही. केवळ याबाबत पारदर्शीपणे विचार व्हावा, इतकेच मला वाटते. आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाला संधी मिळायला हवी. प्रत्येक खेळाडूचे ऑलिंपिक खेळण्याचे स्वप्न असते. 
- निखत झरीन, भारताची युवा बॉक्‍सर 


​ ​

संबंधित बातम्या