अपेक्षा साईनाकडून, पण कृष्णा-विष्णू उपविजेते

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 March 2021

माजी अव्वल मानांकित साईना नेहवाल या स्पर्धेत उपांत्य फेरीत पराजित झाली, तसेच किदांबी श्रीकांतलाही अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आले.

मुंबई : ऑर्लन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत साईना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत यांच्याकडून विजेतेपदाची अपेक्षा बाळगली जात होती, पण हे दोघे निराशा करीत असताना कृष्णा प्रसाद गारगा आणि विष्णुवर्धन गौड यांनी पुरुष दुहेरीत उपविजेतेपद जिंकून सर्वांना धक्का दिला. माजी अव्वल मानांकित साईना नेहवाल या स्पर्धेत उपांत्य फेरीत पराजित झाली, तसेच किदांबी श्रीकांतलाही अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आले. त्याला उपांत्य फेरीपूर्वीच हार पत्करावी लागली. या परिस्थितीत सांगता दिवशी कृष्णा-विष्णू यांच्यावरच भारताच्या आशा होत्या. 

भारतीय जोडीने त्यांच्या पहिल्याच प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीत पहिला गेम जिंकला, पण त्यांना अखेर बेन लेन-सीन वेंडी या चौथ्या मानांकित जोडीविरुद्ध 21-19, 14-21, 19-21 अशा पराभवास सामोरे जावे लागले. कृष्णा आणि विष्णू प्रथमच एकमेकांच्या साथीत दुहेरीत खेळले. कृष्णा यापूर्वी श्‍लोक रामचंद्रनच्या साथीत खेळत असेल, तर विष्णूची वरिष्ठ स्तरावरील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे.

ISSF World Cup : भारतीय नेमबाजांचा ‘षटकार’

तान्या हेमंत उपविजेती

दरम्यान, तान्या हेमंतने पोलिश ओपन स्पर्धेत उपविजेतेपद जिंकले. तिला द्वितीय मानांकित क्रिस्टिन कुबाविरुद्ध 22-24, 14-21 अशी संघर्षपूर्ण हार पत्करावी लागली. तान्याने पात्रता स्पर्धेतून अंतिम फेरीपर्यंत वाटचाल केली. 


​ ​

संबंधित बातम्या