"बीसीसीआय'ची सभा सर्वसाधारणच ः राय

वृत्तसंस्था
Monday, 21 October 2019

- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) बुधवारी (ता. 23) होणारी सभा ही सर्वासाधारणच सभा असेल आणि त्यानंतर नवे अध्यक्ष सौरभ गांगुली वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावतील

- सभेसाठी हंगामी समितीमधील कुणालाही निमंत्रण देण्यात आलेले नाही. ही सभा प्रशासकीय समितीच्या अध्यक्षतेखालीच होईल

मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) बुधवारी (ता. 23) होणारी सभा ही सर्वासाधारणच सभा असेल आणि त्यानंतर नवे अध्यक्ष सौरभ गांगुली वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावतील, असे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सोमवारी स्पष्ट केले. 
"बीसीसीआय'च्या सभेविषयी असलेला गोंधळ दूर करताना राय म्हणाले, ""बुधवारची सभा ही सर्वासाधारण असेल आणि त्याची सूचना सर्व सदस्यांना देण्यात आली आहे. काही जण या सभेला वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणत आहेत. ही सर्वसाधारण सभाच असेल. यामध्ये पदाधिकारी निवडले जातील आणि ती प्रशासकीय समितीने बोलावली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा बोलाविण्याचा अधिकार प्रशासकीय समितीला नाही. ती नवे अध्यक्ष म्हणजे सौरभ गांगुली बोलावतील.'' 
हंगामी समिती नाहीच 
सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद हंगामी अध्यक्ष सी. के. खन्ना भूषवतील, असे मानले जात होते. मात्र, राय यांनी सभेसाठी हंगामी समितीमधील कुणालाही निमंत्रण देण्यात आलेले नाही. ही सभा प्रशासकीय समितीच्या अध्यक्षतेखालीच होईल, असे स्पष्ट केले. अध्यक्ष सौरभ गांगुली आणि नवे पदाधिकारी वार्षिक सर्वसाधरण सभेचा निर्णय घेतील आणि घटनेनुसार त्यासाठी 21 दिवसांची नोटीस दिली जाईल.'' 
अधिकार त्यांचाच 
राय यांनी वार्षिक सभा बोलाविण्याचा अधिकार नव्या पदाधिकाऱ्यांचा असेल, असे सांगितले. ते म्हणाले, ""होय, ही बैठक नवे पदाधिकारी बोलावतील. यामध्ये त्यांच्यासाठी नव्या नियुक्ती करणे आणि विविध समित्या स्थापन करणे, हे दोन विषय प्रामुख्याने विषयपत्रिकेवर असतील. गांगुली आणि जय शहा हे अध्यक्ष आणि सचिव असतील. पण, त्याची अधिकृत घोषणा सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकारी करतील. 
--------------- 
गांगुलीची अध्यक्षपदी निवड ही भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने सर्वोत्तम घटना आहे. एक यशस्वी कर्णधार आता अध्यक्ष होतोय. त्याला क्रिकेट आणि क्रिकेट प्रशासनाची चांगली जाण आहे. त्याच्याशिवाय दुसरा योग्य उमेदवार या पदासाठी असूच शकत नाही. 
- विनोद राय, प्रशासकीय समिती अध्यक्ष 


​ ​

संबंधित बातम्या