संजीवनी जाधवचे यशस्वी पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 March 2021

फेडरेशन ॲथलेटिक्‍स स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीत जिंकले रौप्यपदक
 

नागपूर : तब्बल दोन वर्षांनंतर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने पतियाळा येथे सुरू असलेल्या फेडरेशन करंडक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत महिलांच्या दहा हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकून यशस्वी पुनरागमन केले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चार सुवर्णपदकांचा फैसला लागला. महाराष्ट्राला संजीवनीच्या रौप्यपदकाचा दिलासा असला तरी कृष्णकुमार राणे आणि डिआंड्रा वल्लाडरेसने शंभर मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रवेश करून आशा जागविल्या आहेत. या दोन्ही शर्यतीत मंगळवारी होणार आहेत. 

नाशिककर संजीवनीने शेवटच्या फेरीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या उत्तर प्रदेशच्या सविता पॉलला गाठण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, सविताने दीड सेकंदाच्या फरकाने शर्यत जिंकून संजीवनीला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले. सविताने 33 मिनिटे 59.35 सेकंद तर संजीवनीने 34 मिनिटे 01.26 सेकंद वेळ दिली. उत्तर प्रदेशच्या कविता यादवने ब्राँझपदक जिंकले. द्युती विरुद्ध हिमा दास सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या दोन ॲथलिट ओडिशाची द्युती चंद आणि आसामची डीएसपी झालेली हिमा दास मंगळवारी होणाऱ्या महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत आमने-सामने आहेत. हिमाने यंदा ग्रांप्रीमध्ये शंभर मीटर शर्यतीत भाग घेतला असला तरी तिच्यापुढे केवळ द्युतीच नव्हे तर तमिळनाडूच्या धनलक्ष्मीचेही आव्हान आहे. धनलक्ष्मीने 11.38, द्युतीने 11.51 सेकंद अशी, तर हिमाने 11.63 सेकंद अशी वेळ दिली आहे. 

राणे, डिआँड्रा अंतिम फेरीत

पतियाळा येथेच झालेल्या इंडियन ग्रांप्री स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुण्याच्या कृष्णकुमार राणेने उपांत्य फेरीत 10.57 सेकंदाची वेळ देत अंतिम फेरी गाठली आणि आपण सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार आहोत, हे दाखवून दिले. त्याच्यापुढे तेलंगणाचा अमलान, तमिळनाडूचा इलीक्‍यदासन आणि पंजाबचा हरजित सिंग यांचे आव्हान आहे. डिआंड्राने 12.01 सेकंद वेळ दिली आणि अंतिम फेरीत स्थान पक्के केले. 


​ ​

संबंधित बातम्या